‘जब हॅरी मेट सेजल’ : शाहरूख-अनुष्काची हरवलेली केमिस्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 01:29 PM2017-08-04T13:29:27+5:302023-08-08T19:16:16+5:30
यातली प्रत्येक व्यक्तीरेखा ही प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी. या सिनेमांप्रमाणेच प्रेक्षकांनी ‘जब हॅरी मेट सेजल’ कडूनही अपेक्षा ठेवली होती. मात्र, या चित्रपटातून इम्तियाज अली यांनी प्रेक्षकांची सपशेल निराशा केली असल्याचे दिसून येत आहे.
दिग्दर्शक इम्तियाज अली यांचं नाव घेतलं की, ‘जब वी मेट’,‘लव आज कल’, ‘तमाशा’, ‘रॉकस्टार’ या सिनेमांची आठवण होते. उत्तम स्टारकास्ट, स्टोरी, प्लॉट, गाणी यांची सरमिसळ असलेले हे सिनेमे. यातली प्रत्येक व्यक्तीरेखा ही प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी. या सिनेमांप्रमाणेच प्रेक्षकांनी ‘जब हॅरी मेट सेजल’ कडूनही अपेक्षा ठेवली होती. मात्र, या चित्रपटातून इम्तियाज अली यांनी प्रेक्षकांची सपशेल निराशा केली असल्याचे दिसून येत आहे.
युरोपात तरूण-तरूणी भेटतात...एकमेकांच्या प्रेमात पडतात...पुढे ते वेगळे होतात..शेवटी कुटुंबाच्या विरोधात जाऊन ते एकत्र येतात. अशा कथानकाच्या चित्रपटांनी आत्तापर्यंत शंभरी गाठली असेल. मात्र, इम्तियाज अली यांचा सिनेमा म्हटल्यावर आपल्याला काहीतरी नवीन विषय पाहायला मिळणार, अशी अपेक्षा ठेवून जाणाऱ्या प्रेक्षकांना त्याच जुन्या स्टाईलने हॅरी-सेजलची कथा बघावयास मिळते.
हॅरी आणि सेजलची भेट एका युरोप ट्रिपदरम्यान होते. जेव्हा सेजलची साखरपुड्याची अंगठी हरवते आणि अंगठीशिवाय ती भारतात परतण्यास नकार देते; अशा वेळी कोणताच पर्याय न उरल्याने अंगठी शोधण्यासाठी हॅरी तिची मदत करत असतो. ट्रिपदरम्यान सेजल ज्या-ज्या ठिकाणांना भेट देते तेथे हे दोघे पुन्हा एकदा अंगठी शोधण्यासाठी जातात. मात्र यावेळी सेजल त्या ठिकाणांना पुन्हा नव्याने अनुभवते. तिच्या सहवासात हॅरीलाही आपण कुटुंबापासून किती दुरावलो आहे, याची अनुभूती येते. अंगठी शोधण्यासाठी सुरु झालेल्या या दोघांच्या प्रवासाचा शेवट स्वत:ला शोधण्याने होतो.
चित्रपटाची सुरूवात हॅरी आणि सेजल यांच्यातील काही कॉमेडी डायलॉग्ज आणि एकमेकांना चिडवण्याने होते. पण, पुढे त्यांच्यातील रोमान्स प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत नाही, हे देखील तितकेच खरे. या काही सीन्समुळे प्रेक्षकांना ‘जब वी मेट’, ‘लव्ह आज कल’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटांची आठवण होते. पण, या चित्रपटांची दमदार पटकथा, कथानक यांच्यासमोर ‘जब हॅरी मेट सेजल’ नक्कीच कमकुवत वाटतो.
चित्रपटाची पटकथा काही ठिकाणी असंबंधित वाटते. कारण सेजल तिची अंगठी शोधण्यात एवढा पैसा खर्च करते की, त्यात तीन अंगठ्या तरी नक्कीच येतील. तसेच हा सिनेमा त्यांच्यातील प्रेमाची जर्नीसारखा कुठेच वाटत नाही. त्याशिवाय चित्रपटाचे संगीतही प्रेक्षकांच्या हृदयाला भिडत नाही. थोडक्यात काय तर, ‘जब हॅरी मेट सेजल’ हा सिनेमा ‘लव्ह आज कल’ आणि ‘जब वी मेट’ यांच्यापेक्षा चांगला नसला तरी ‘तमाशा’ आणि ‘रॉकस्टार’ यांपेक्षा नक्कीच उत्तम आहे.