Why Cheat India Movie Review:भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेची पोलखोल
By सुवर्णा जैन | Published: January 18, 2019 12:23 PM2019-01-18T12:23:37+5:302023-08-08T19:28:38+5:30
व्हाय चीट इंडिया चित्रपटाच्या कथेला साजेसे संवाद आणि चित्रपटाचं पार्श्वसंगीत आणि संगीत रसिकांना खिळवून ठेवण्यात काही अंशी यशस्वी ठरतं.
सुवर्णा जैन
शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढत असल्याचे आपण वारंवार ऐकत आहोत. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला गैरव्यवहाराची कीड लागल्याचंही ऐकायला मिळतं. हाच गंभीर आणि महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडणारा ‘व्हाय चीट इंडिया’ हा हिंदी चित्रपट. दिग्दर्शक सौमिक सेन यांनी शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे फसवणूक सुरू आहे, भ्रष्टाचाराची कीड ज्ञानगंगेला प्रदूषित करत आहे आणि शिक्षण क्षेत्रात माफियांची घुसखोरी झाली आहे याचं प्रतिकात्मक चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राकेश सिंह उर्फ रॉकी भैय्या (इमरान हाशमी) याच्या अवतीभोवती या सिनेमाचं कथानक फिरतं. रॉकी भैय्या हा बडा माफिया असून शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी मोठं रॅकेट चालवतो. यासाठी गरीब हुशार मुलांच्या हुशारीचा वापर करून घेतो.
बड्या घरांच्या मुलांना प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळावा यासाठी रॉकी भैय्या गरीब हुशार मुलांचा वापर करून घेतो. प्रवेशपूर्व परीक्षेला डमी उमेदवार बसवत या या बड्या घरच्या मुलांचा प्रवेश सुकर होईल यासाठी रॉकी भैय्या गरीब मुलांचा वापर करतो. या बदल्यात रॉकी भैय्या बड्या घरच्या मुलांच्या पालकांकडून घसघशीत रक्कम वसूल करतो. रॉकी भैय्या आपलं हे रॅकेट कसं चालवतो, त्या गरीब हुशार मुलांचं काय होतं आणि या रॅकेटचा पर्दाफाश होऊन रॉकी भैय्याचा खरा चेहरा समोर येतं या सगळ्याची उत्तरं व्हाय चीट इंडिया या चित्रपटात मिळतील.
हा चित्रपट पूर्वार्धात खिळवून ठेवतो आणि तितकंच मनोरंजनही करतो. मात्र उत्तरार्धात चित्रपट काहीसा रटाळ वाटू लागतो. चित्रपटचा क्लायमॅक्सही निराशाजनक वाटतो. मात्र संपूर्ण चित्रपटात इमरान हाशमी भाव खावून जातो. त्यानं साकारलेला रॉकी भैय्या शेवटपर्यंत दमदार आणि प्रभावी ठरतो. बऱ्याच काळानंतर इमरानला तो ज्या पद्धतीच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध अशी भूमिका मिळाली आहे. या भूमिकेला त्याने पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मग ते झाशीमधला एक मुलगा असो किंवा मग रॉकी भैय्या नावाचा माफिया. व्हाय चीट इंडिया चित्रपटाची धुरा इमरानने शेवटपर्यंत आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहिली आहे.
नवोदित श्रेया धन्वंतरीनेही पदार्पणातच आपल्या भूमिकेतून छाप पाडली आहे. रुपेरी पडद्यावरील तिचा वावर आश्वासक आणि आत्मविश्वासाने भरलेला वाटतो. सत्तू आणि बबलू या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या भूमिकाही लक्षवेधी आहेत. कथेला साजेसे संवाद आणि चित्रपटाचं पार्श्वसंगीत आणि संगीत रसिकांना खिळवून ठेवण्यात काही अंशी यशस्वी ठरतं.
सौमिक सेन यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहे. मात्र सिनेमा एडिटिंगमध्ये मार खातो. आणखी अचूक आणि बारकाईने एडिटिंग झालं असतं तर चित्रपटाच्या पटकथेत आणखी जिवंतपणा आला असतं असं राहून राहून वाटतं. ‘नकल में ही अकल हैं’ अशी वादग्रस्त टॅगलाइन असलेला ‘व्हाय चीट इंडिया’ हा चित्रपट शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट व्यवस्थेवर परखड भाष्य करतो. इमरान हाशमीचा रुपेरी पडद्यावरील दमदार वावर आणि कधीही न पाहिलेला परफॉर्मन्स यासाठी ‘व्हाय चीट इंडिया’ हा चित्रपट नक्की पाहू शकता.