Ye Re Ye Re Paisa 2 film review : डोक्याला नो शाॅट अशी पैसा वसूल काॅमेडी
By अजय परचुरे | Published: August 9, 2019 02:18 PM2019-08-09T14:18:20+5:302023-08-08T19:47:32+5:30
ये रे ये रे पैसा 2 हा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय अभिनेता हेमंत ढोमेने.
जबरदस्त स्टारकास्ट,उत्तम निर्मितीमूल्यं, साहेबाच्या देशात जवळपास संपूर्ण सिनेमाचं शूटींग , श्रवणीय संगीत , निखळ मनोरंजन अश्या सगळ््या गोष्टी जुळून आल्या की एक मसालेदार सिनेमा तयार होतो. अश्यावेळी आपण त्यातील कथेच्या फार खोलात जात नाही. सिनेमासाठी कथा नक्कीच महत्वाची असली तरी अश्या मसालेदार सिनेमात एक प्रेक्षक म्हणून आपण ती अपेक्षा ठेवत नाही. कारण आपल्याला तेव्हा जास्त डोक्याला शॉट नको असतो हवं असतं ते फक्त आणि फक्त निखळ मनोरंजन .ये रे ये रे पैसा २ हा सिनेमाही त्याच श्रेणीत येतो. जास्त डोक्याला ताप नाही ,जास्त खोलात जाणारं कथानक नाही. मस्त धमाल ,मस्ती करत पाहावी अशी मॅड मॅड कॉमेडी म्हणजे ये रे ये रे पैसा २ हा सिनेमा आहे.
ये रे ये रे पैसा या सिनेमाचा पहिला भाग संजय जाधवने दिग्दर्शित केला होता. तेव्हाही तितकीच धमाल त्या सिनेमात होती. निर्माते अमेय खोपकर यांनी दुसºया भागाच्या दिग्दर्शनाची सूत्रं सोपवली ती अभिनेता हेमंत ढोमेकडे. हेमंतने आपल्या आयडियाच्या कल्पनेतून हा भाग अजून फुलवला आहे. कथानक तसं साधंच आहे. पहिल्या भागातील वसुलीभाई अण्णा( संजय नार्वेकर) आता दक्षिण अफ्रिकेवरून परत आलाय.मात्र आता या वसुलीभाईची परिस्थीती म्हणावी तितकी चांगली नाही.त्यात त्याची बायको रंजनाने (विशाखा सुभेदार) परत ती प्रतिष्ठा मिळव नाहीतर मला विसर अशी विचित्र अट घातली आहे. अण्णा विचित्र पेचात पडलेला असतो. आपला मेहुणा (आनंद इंगळे) सोबत आता काय करायचं याच्या विचारात असताना त्याच्या मॅडम (मृणाल कुलकर्णी) त्याच्यासमोर एक प्रस्ताव ठेवतात. निरज शहा( पुष्कर श्रोत्री) हा त्यांच्या बॅकेतून १० हजार करोड रूपये घेऊन लंडनला पोबारा झालाय. त्याच्याकडून त्या पैश्याची वसुली आणि त्याला सहीसलामत भारतात घेऊन येण्याची जबाबदारी ती अण्णावर टाकते त्याबदल्यात कमिशन म्हणून ती अण्णाला १०० करोडची ऑफर करते. अण्णा ही ऑफर स्वीकारतो आणि आपली टीम बनवतो. यात तो हॅकर असलेल्या (अनिकेत विश्वासराव) ,लंडनची माहिती असलेल्या (मृण्मयी गोडबोले) आणि पोलिसांचा आगरी खबरी (प्रियदर्शन जाधव) ला सामील करून घेतो. मिशन सुरू होतं. टीम लंडनला पोहचते आणि मिशन सुरू होतं. त्यात त्यांना लंडनमध्ये पोलिसांच्या वेशात आलेला कंट्री (प्रसाद ओक) ही सामील होतो. आपल्या पध्दतीने हे मिशन पूर्ण करण्याचा अण्णा आणि त्याची टीम प्रयत्न करते. यात त्यांना असंख्य अडचणी येतात, धमाल होते. निरज शहाचा बिझनेस सांभाळत असलेली काव्या( स्मिता गोंदकर) ही अनेक नाट्यपूर्ण घटना यात घडवून आणते. अश्या नानाविध गोष्टी घडत असताना खरंच अण्णा आणि त्याची टीम आपल्या मिशनमध्ये यशस्वी होते का ? नीरज शहा त्यांच्या हातात येतो की गायब होतो ? का निराळंच कोणी तरी पडद्यामागून हालचाली करतंय याचं उत्तर तुम्हांला सिनेमा पाहूनच कळेल. हेमंत ढोमेच्या कथेत म्हणावं तसं काही नाविन्य नाहीये. ही एक मॅड मॅड कॉमेडी आहे. मात्र हेमंतने या सिनेमाचा वेग मात्र नेमका ठेवला आहे. हेमंतने पहिल्या भागातील मोजकीच पात्रं कायम ठेवत दुसऱ्या भागात भन्नाट कलाकारांची फळी जोडली आहे. या सिनेमात उत्तम निर्मितीमूल्ये आहेत. अमेय खोपकर या निर्मात्याने कोणतीही घासाघीस न करता सिनेमाच्या कथेला साजेश्या लंडनमध्ये या सिनेमाचं ९५ टक्के शूटींग केलं आहे. ज्यामुळे आजपर्यंत मराठी सिनेमात न दिसलेल्या अनेक गोष्टी या सिनेमात दिसायला मिळाल्यात हे या सिनेमाचं वैशिष्ठय आहे.
सिनेमातील जबरदस्त स्टारकास्ट हा या सिनेमाचा यूएसपी आहे. संजय नार्वेकरचा अण्णा गेल्या भागापेक्षा या भागात अजून जास्त फर्मास झाला आहे. संजयचं विनोदाचं टायमिंग अजूनही तितकंच परफेक्ट असल्याने पूर्ण सिनेमाभर संजय मजा आणतो. पुष्कर श्रोत्रीने निरज शहाच्या भूमिकेत अजून मजा आणली आहे. लंडनमध्ये पळून गेलेल्या या निरज शहाचा आब ,त्याची स्टाईल त्याने उत्तम साकारलीय. प्रसाद ओकनेही कोल्हापूरी कंट्री हे पात्र फर्मास रंगवलं आहे. आनंद इंगळे ,स्मिता गोंदकर आणि विशाखा सुभेदार यांनीही आपली पात्रं जबरदस्त साकारत उत्तम साथ दिली आहे. अनिकेत विश्वासराव, मृण्मयी गोडबोले आणि प्रियदर्शन जाधव या जबरदस्त तिकडीने तर चारचांद लावले आहेत. उत्तम निर्मितीमूल्ये, उत्तम टायमिंग असलेली कॉमेडी, कलाकारांचा अप्रतिम अभिनय आणि साहेबाचा देश पाहण्यासाठी हा सिनेमा एकदा पाहायला काहीच हरकत नाही. जास्त डोक्याला शॉट नाही अशी पैसा वसूल कॉमेडी पाहावी अशीच आहे.