ऋषी कपूर विचारतायेत, मी घरी कधी परतणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 01:23 PM2019-05-31T13:23:47+5:302019-05-31T13:24:25+5:30
ऋषी कपूर यांना आता घरी जाण्याची ओढ लागलेली आहे. ऋषी कपूर यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून हे लक्षात येत आहे.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत होते. ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेत रवाना झाल्यानंतर काहीच दिवसांत त्यांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. पण ऋषी कपूर आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना कॅन्सर असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्यामुळे ऋषी यांना कुठला आजार झाला, हे कळायला मार्ग नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी खुद्द ऋषी कपूर यांनी त्यांना कॅन्सर होता, याची कबुली दिली.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूर यांनी कॅन्सरशी दिलेल्या लढाईचे अनुभव सांगितले होते. ‘गेल्यावर्षी १ मे रोजी माझ्या उपचाराला सुरुवात झाली होती. परमेश्वराच्या कृपेने आत्ता मी कॅन्सर मुक्त झालोय,’ असे ऋषी कपूर यांनी या मुलाखतीत सांगितले होते. कॅन्सर मुक्त झाल्यानंतर आणखी काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू राहणार असल्याने ते अजूनही अमेरिकेतच आहेत.
ऋषी कपूर यांना आता घरी जाण्याची ओढ लागलेली आहे. ऋषी कपूर यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून हे लक्षात येत आहे. त्यांनी ट्वीट द्वारे प्रश्न विचारला आहे की, मी न्यूयॉर्क मध्ये येऊन आता आठ महिने पूर्ण झाले आहेत. मी माझ्या घरी परत कधी परतणार?
Today I complete eight months here in New York. When will l ever get home?
— Rishi Kapoor (@chintskap) May 30, 2019
ऋषी कपूर यांच्या या ट्वीटवर त्यांच्या चाहत्यांनी लगेचच उत्तरं दिली आहेत. तुम्ही लवकरच भारतात परताल याची आम्हाला खात्री आहे असे काहींनी रिप्लाय देताना म्हटले आहे तर काहींनी तुमचा येणारा वाढदिवस तुम्ही मुंबईत साजरा कराल असा रिप्लाय केला आहे तर काहींनी देवाचे आशीर्वाद तुमच्यासोबत असून तुम्ही लवकरच मुंबईत परत याल... असे म्हटले आहे.
भारतात परतण्याच्या कल्पनेने ऋषी कपूर प्रचंड आनंदी झाले असल्याचे त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. ‘मला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचा आहे. यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल. कॅन्सरचा विळखा सोडवणे एक मोठी गोष्ट आहे. माझे कुटुंब आणि माझ्या चाहत्यांच्या शुभेच्छा केवळ यामुळे हे शक्य झाले. मी त्यांचा आभारी आहे. विशेषत: नीतूचा मी प्रचंड आभारी आहे. ती माझ्यासोबत अगदी खंबीरपणे उभी राहिली. खाण्यापिण्याच्या बाबतीत माझ्यासारख्या व्यक्तीला हाताळणे कठीण आहे. पण तिने सगळे काही केले. माझी मुले रणबीर आणि रिद्धिमा यांनी माझ्या सगळ्या चिंता आपल्या खांद्यावर घेतल्या. माझ्यात संयम नावाची गोष्ट मुळीच नाही. कदाचित मला संयम शिकवण्यासाठी परमेश्वराने हा मार्ग अवलंबला असावा. या आजारातून मुक्त होणे एक अतिशय वेळखाऊ प्रक्रिया आहे. पण मृत्युच्या दाढेतून परत येत आयुष्याची भेट मिळणे शानदार असते,’असे ऋषी कपूर यांनी सांगितले होते.