‘या’ तारखेला मुंबईत परतणार ऋषी कपूर, उपचारादरम्यान साईन केलेत तीन सिनेमे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 02:13 PM2019-07-15T14:13:01+5:302019-07-15T14:15:10+5:30
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत आहेत. ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेत रवाना झाल्यानंतर काहीच दिवसांत त्यांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत आहेत. ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेत रवाना झाल्यानंतर काहीच दिवसांत त्यांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. पण ऋषी कपूर आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना कॅन्सर असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्यामुळे ऋषी यांना कुठला आजार झाला, हे कळायला मार्ग नव्हता. मात्र अलीकडे खुद्द ऋषी कपूर यांनी स्वत: त्यांना कॅन्सर होता, याची कबुली दिली होती. अनेक महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असलेल्या ऋषी कपूर यांना चाहते मिस करत आहेत. पण लवकरच चाहत्यांचा हा आवडता अभिनेता पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. होय, अमेरिकेत उपचारादरम्यान ऋषी कपूर यांनी एक नाही, दोन नाही तर तीन चित्रपट साईन केले आहेत. विशेष म्हणजे, ऋषी कपूर यांच्या मायदेशी परतण्याची तारीखही ठरली आहे.
अलीकडे शक्ती कपूर यांनी द कपिल शर्मा शोमध्ये या तारखेचा खुलासा केला. शक्ती कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे या शोमध्ये गेस्ट म्हणून पोहोचले होते. यादरम्यान पद्मिनी यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक किस्सा शेअर केला. याचवेळी पद्मिनींच्या बाजूला बसलेले शक्ती कपूर बोलू लागले. ‘आपण सगळे ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. मी रोज त्यांच्याशी बोलतो आणि आज मी याठिकाणी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो, ती म्हणजे ऋषी कपूरजी 2 वा 3 सप्टेंबरला मुंबईत परत येत आहेत,’ असे ते म्हणाले. ऋषी कपूर यांनी न्यूयॉर्कमध्ये बसल्या बसल्या दोन-तीन चित्रपट साईन केले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी कॅन्सरशी दिलेल्या लढाईचे अनुभव सांगितले होते. ‘अमेरिकेत ८ महिन्यांचा उपचार होता. गतवर्षी १ मे रोजी माझ्या उपचाराला सुरुवात झाली होती. परमेश्वराच्या कृपेने आत्ता मी कॅन्सर मुक्त झालोय,’ असे ऋषी कपूर या मुलाखतीत म्हणाले. अर्थात कॅन्सर मुक्त झाल्यानंतर आणखी काही काळ त्यांच्यावर उपचार सुरु राहणार आहेत.