Rishi Kapoor funeral: केवळ १५ लोकांच्या उपस्थितीत मरिन लाईन्सच्या स्मशानभूमीत होणार ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 01:28 PM2020-04-30T13:28:52+5:302020-04-30T13:30:49+5:30
सध्या भारतात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने लोकांनी गर्दी होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.
काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
ऋषी कपूर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची मुलगी रिधीमा त्यांची प्रचंड लाडकी असून अनेक मुलाखतींमध्ये देखील त्यांनी तिचा उल्लेख केला आहे. त्यांची काल तब्येत बिघडल्यानंतर काल रात्रीपासून रुग्णालयात त्यांची पत्नी नितू सिंग आणि रणबीर कपूर उपस्थित आहेत. पण त्यांची मुलगी रिधीमा कपूर सध्या दिल्लीत आहे. पण तिला प्रवास करण्याचा पास मिळाला असून ती कारने मुंबईला येण्यासाठी निघाली आहे. पण रिधीमा यायच्याआधीच अंतिम संस्कार केले जातील असा अंदाज लावला जात आहे.
मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील चंदन स्मशानभूमीत ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून सध्या तिथे तयारी सुरू आहे. काहीच तासांत त्यांचे पार्थिव अॅम्ब्यूलन्सने तिथे नेण्यात येणार आहे. सध्या भारतात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने केवळ पंधरा लोकांनाच अंत्यदर्शनाला उपस्थित राहाण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांतील मंडळी आणि जवळचे नातेवाईकच तिथे उपस्थित राहाणार असल्याचे म्हटले जात आहे.