लॉकडाऊनमुळे ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्काराबाबत घेण्यात आला हा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:06 PM2020-04-30T15:06:02+5:302020-04-30T15:08:34+5:30
सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने लोकांनी गर्दी करू नये याची काळजी घेतली जात आहे.
काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
ऋषी कपूर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची काल तब्येत बिघडल्यानंतर काल रात्रीपासून रुग्णालयात त्यांची पत्नी नितू सिंग आणि रणबीर कपूर उपस्थित आहेत. ऋषी कपूर यांचे नातेवाईक आणि बॉलिवूडमधील जवळचे मित्रमंडळी देखील रुग्णालयात यायला सुरुवात झाली आहे. ऋषी कपूर यांची पुतणी करिना कपूर आणि जावई सैफ अली खान नुकतेच रुग्णालयात पोहोचले आहेत. त्याचसोबत रणबीर कपूरची मैत्रीण आणि अभिनेत्री आलिया भट कपूर कुटुंबियांसोबत उपस्थित आहे. तसेच अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची अनेक वर्षं मेत्री असून ऋषीच्या निधनामुळे मी तुटलो आहे असे भावुक ट्वीट अमिताभ यांनी केले होते. अमिताभ यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन देखील सध्या कपूर कुटुंबियांसोबत रुग्णालयातच आहे.
सेलिब्रेटी मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल होत असल्याने पोलिसांना तिथली परिस्थिती सांभाळणे कठीण जात आहे. त्यामुळे पोलिसांनी कपूर कुटुंबाला विनंती केली आहे की, लोकांची गर्दी टाळण्यासाठी पार्थिव घरी न नेता थेट स्मशानभूमीत नेण्यात यावे... त्यामुळे पार्थिव घरी न नेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
ऋषी कपूर यांची लोकप्रियता पाहाता लोक गर्दी करतील अशी भीती सगळ्यांनाच आहे. कपूर कुटुंबियांनी देखील लोकांनी गर्दी करू नये अशी विनंती लोकांना केली आहे.
ऋषी कपूर गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते. काल रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 2018 मध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.