Krisha Raj Kapoor Funeral: या कारणामुळे कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला ऋषी कपूर, नीतू सिंग आणि रणबीर कपूर राहिले गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 11:31 AM2018-10-02T11:31:23+5:302018-10-02T11:33:11+5:30
कृष्णा राज कपूर यांच्या पश्चात रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर, रिमा जैन आणि रितू कपूर नंदा अशी त्यांची मुले आहेत. ऋषी वगळता त्यांची सगळीच मुले त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होती.
बॉलिवूडचे शो मॅन दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे मुंबईत नुकतेच दीर्घआजाराने निधन झाले. दीर्घकाळापासून कृष्णा राज कपूर आजारी होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कृष्णा कपूर यांना अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. अनिल कपूर, त्याची पत्नी सुनीता कपूर, संजय कपूर, त्याची पत्नी महीप कपूर, प्रेम चोप्रा, काजोल, राणी मुखर्जी, सैफ अली खान, टीना अंबानी, अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील रणधीर कपूर, राजीव कपूर, रिमा जैन, करिना कपूर, करिश्मा कपूर, आदर जैन उपस्थित होते.
कृष्णा राज कपूर यांच्या पश्चात रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर, रिमा जैन आणि रितू कपूर नंदा अशी त्यांची मुले आहेत. ऋषी वगळता त्यांची सगळीच मुले त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होती. कृष्णा राज कपूर यांचे सुपुत्र ऋषी कपूर हे सध्या उपचार घेण्यासाठी अमेरिकेत असल्याने ते अंतिम संस्कारासाठी मुंबईत येऊ शकले नाहीत. त्यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूर आणि त्यांची पत्नी नितू सिंग त्यांच्यासोबतच अमेरिकेला आहेत. पण तो मुंबईत येण्यासाठी रवाना झाला असल्याचे म्हटले जात होते. पण रणबीर तसेच नीतू कपूर देखील कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्या नाहीत. ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेला जात असल्याचे त्यांनी तीन-चार दिवसांपूर्वीच सोशल मीडियाद्वारे कळवले होते. ऋषी कपूर कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी अमेरिकेला गेले आहेत याबाबत अद्याप कपूर कुटुंबियांकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाहीये.
कृष्णा राज कपूर या अभिनेत्री करिना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या आजी होत्या. ८७ वर्षांच्या वयातही त्या बऱ्याच अॅक्टिव्ह होत्या. फॅमिली पार्टी आणि अनेक चित्रपटाच्या प्रीमिअरला त्या हजेरी लावत. १९८८ मध्ये राज कपूर यांचे निधन झाले़ यानंतर कृष्णा यांनीच संपूर्ण घराला आधार दिला.