मी कमबॅक करणार.... असा होता ऋषी कपूर यांना विश्वास... पण नियतीच्या मनात होते काही वेगळे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 11:18 AM2020-04-30T11:18:25+5:302020-04-30T11:19:39+5:30
ऋषी कपूर यांना बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची इच्छा होती. त्यांनी उपचार घेऊन भारतात आल्यानंतर एक फोटोशूट देखील केले होते.
काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
ऋषी कपूर यांना २०१८ मध्ये कॅन्सर झाला असल्याचे कळले. त्यानंतरर सप्टेंबर २०१८ मध्ये ते कॅन्सरवरील उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले होते.११ महिन्याच्या उपचारानंतर ते भारतात परतले होते. परतल्यानंतर काहीच दिवसांनंतर ऋषी कपूर यांनी एक फोटोशूट केले होते. ऋषी कपूर यांना बॉलिवूडमध्ये परतायचे होते आणि काहीही झाले तरी मी कमबॅक करणार हा त्यांना विश्वास होता. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी एक फोटोशूट केले आहे. या माध्यमातून ते त्यांच्या फॅन्सच्या भेटीला आले होते. हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी केले होते. ऋषी कपूर यांच्या फॅन्सना हे फोटोशूट प्रचंड आवडले होते. या फोटोंमधून मायदेशी परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता.
ऋषी कपूर न्यूयॉर्कला असताना त्यांची पत्नी अभिनेत्री नितू सिंग सतत त्यांच्यासोबत होती. त्याचसोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिथे जाऊन त्यांची भेट घेतली होती. उपचारानंतर ११ महिन्याने ऋषी कपूर भारतात परतले होते. त्यावेळी विमानतळावर फोटोग्राफर्सनी त्यांची छबी कॅमेऱ्यात टीपली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी घरी परतल्यावर ट्विटरद्वारे सर्वांचे आभार मानले होते. घरी परतलो. ११ महिने ११ दिवस. तुम्हा सर्वांचे खूप आभार, असे त्यांनी लिहिले होते. याशिवाय आजारपणाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पत्नी नीतू यांच्याबद्दलही त्यांनी भरभरून लिहिले होते. ‘या कठीण काळात नीतू माझा आधार स्तंभ होती. मी तिचा खूप आभारी आहे,’ असे त्यांनी म्हटले होते.