रिधीमा कपूरला घेता येणार वडील ऋषी कपूर यांचे अंत्यदर्शन, मिळाली दिल्ली-मुंबई प्रवासाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 12:56 PM2020-04-30T12:56:45+5:302020-04-30T13:05:48+5:30
रिधीमा तिचे वडील ऋषी कपूर यांची प्रचंड लाडकी असून तिला तिच्या वडिलांचे अंतिमदर्शन घेण्याची इच्छा आहे.
काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
ऋषी कपूर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची मुलगी रिधीमा त्यांची प्रचंड लाडकी असून अनेक मुलाखतींमध्ये देखील त्यांनी तिचा उल्लेख केला आहे. त्यांची काल तब्येत बिघडल्यानंतर काल रात्रीपासून रुग्णालयात त्यांची पत्नी नितू सिंग आणि रणबीर कपूर उपस्थित आहेत. पण त्यांची मुलगी रिधीमा कपूर सध्या दिल्लीत आहे. रिधीमाचे लग्न झाले असून ती गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीतच पती आणि मुलीसोबत राहाते. एनडिटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषी कपूर यांची तब्येत काल बिघडल्यानंतर रिधीमाने चार्टड विमानने मुंबईला जाण्याची परवानगी गृह खात्याकडे मागितली होती. पण विमानने जाण्याची परवानगी केवळ तिला गृहमंत्री अमित शाहच देऊ शकतात असे तिला सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने दुसरा पर्याय निवडत कारने मुंबईला जाण्याचे ठरवले आहे.
एनडिटिव्हीला दिल्लीमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रिधीमा आणि तिच्या कुटुंबियांना रात्रीच मुंबईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा केसेसमध्ये पोलिस लगेचच परवानगी देत असल्याने रिधीमाला देखील काहीच मिनिटांत परवानगी मिळाली आहे. सकाळी रिधिमाला प्रवास करण्याचा पास मिळाला असून पाच जणांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रिधीमाला दिल्ली-मुंबई असा १४०० किमीचा प्रवास करायला १८ तास लागणार आहेत. सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने देशभरातील विमान, रेल्वे सेवा बंद आहेत.