रितेश म्हणतो, माझे मराठी ग्रामीण बाजाचे
By Admin | Published: October 21, 2016 03:37 AM2016-10-21T03:37:21+5:302016-10-21T03:37:21+5:30
रितेश देशमुखने क्या कूल है हम, मस्ती, अपना सपना मनी मनी, हे बेबी यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रितेशने बॉलिवूडमध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली
रितेश देशमुखने क्या कूल है हम, मस्ती, अपना सपना मनी मनी, हे बेबी यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रितेशने बॉलिवूडमध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली असली, तरी तो नंतरच्या काळात मराठी चित्रपटातही झळकला. लय भारी या त्याच्या पहिल्याच मराठी चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगलाच गल्ला जमवला आणि आता ‘विकता का उत्तर’ या कार्यक्रमाद्वारे त्याने छोट्या पडद्यावर एंट्री केली आहे. या कार्यक्रमाचा तो सूत्रसंचालक आहे. सूत्रसंचालन करण्यासाठी तो घाबरला होता. याचे कारण म्हणजे त्याचे मराठी. त्याचे मराठी हे ग्रामीण बाजाचे असल्याने तो मराठी बोलल्यावर लोक हसतील, असे त्याला वाटत होते. तो सांगतो, ‘मी मूळचा लातूरचा असल्याने माझे मराठी हे ग्रामीण भागातील आहे. तसेच माझे सगळे शिक्षण हे इंग्रजीतून झाले असल्याने शुद्ध मराठी शिकण्याचा कधी प्रश्नच आला नाही. मित्रमैत्रिणींमध्ये मी इंग्रजीत अथवा हिंदीत बोलतो. घरी मी मराठी बोलत असलो, तरी त्याचा लहेजा ग्रामीण भागातील आहे, असे मला नेहमी वाटते. मराठीतील काही शब्दांचे उच्चारही मी वेगळ्या पद्धतीने करतो. त्यामुळे माझे मराठी ऐकून लोक हसतील, अशी मला भीती वाटत होती. पण हा कार्यक्रम करायला लागल्यापासून माझे मराठी खूप सुधारले आहे. मी याचे श्रेय माझ्या ‘विकता का उत्तर’ या कार्यक्रमाच्या सगळ्या टीमला देतो.