रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रेमकथेविषयी रोहित शेट्टीने सांगितले हे सिक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 08:00 AM2018-12-15T08:00:00+5:302018-12-15T08:00:02+5:30
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात सिम्बा या आगामी चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. रणवीर सिंग, सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले.
इंडियन आयडॉलच्या या सिझनला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस गाणी सादर करत आहेत. आता खूपच कमी स्पर्धक शिल्लक असून या मधून कोण विजेता ठरतोय याची सगळयांना उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात.
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात सिम्बा या आगामी चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. रणवीर सिंग, सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. आपल्या धमाकेदार एंट्रीने आणि सेटवरील आपल्या उपस्थितीने त्यांनी मंच दणाणून सोडला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाचा स्पर्धक विभोर पराशरने रोहित शेट्टी दिग्दर्शित चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील ‘लुंगी डान्स’ या लोकप्रिय गीतावर दमदार परफॉर्मन्स सादर केला. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि शाहरुख खानची मुख्य भूमिका होती. या परफॉर्मन्सनंतर रणवीर सिंगने त्या चित्रपटाच्या सेटवर अनेकवेळा दीपिकाला भेटायला गेल्याची आठवण सगळ्यांना सांगितली. रणवीरने सांगितले की, तो खास दीपिकाला भेटण्यासाठी ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या सेटवर जात असे.
त्यावर दिग्दर्शक रोहित शेट्टीने रणवीरची फिरकी घेत म्हटले, “दीपिका आणि रणवीर यांच्या विवाहात माझी मोठी भूमिका आहे. कारण माझ्या चित्रपटाच्या सेटवर मी त्या दोघांना भेटण्याची परवानगी दिली होती.”
रणवीर सिंग इंडियन आयडॉल या कार्यक्रमातील स्पर्धकांचे परफॉर्मन्स पाहून खूपच खूश झाला होता. तो सांगतो, “मला विभोरचा परफॉर्मन्स खूपच आवडला. त्याची गाण्यांची निवड अप्रतिम असते. या गाण्याने मला तो काळ आठवून दिला, जेव्हा मी दीपिकाला भेटायला रोहित सरांच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाच्या सेटवर जात असे.”
इंडियन आयडॉल 10 ची उपांत्य फेरी प्रेक्षकांना येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.