हिना खान म्हणते, ही भूमिका ठरली माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट
By तेजल गावडे | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:00+5:30
अभिनेत्री हिना खानची नुकतीच हंगामा प्लेवर 'डॅमेज्ड २' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याशिवाय ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.
अभिनेत्री हिना खानची नुकतीच हंगामा प्लेवर 'डॅमेज्ड २' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याशिवाय ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. यानिमित्ताने केलेली ही बातचीत...
- तेजल गावडे
डिजिटल प्लॅटफॉर्मबद्दल तुला काय वाटतं?
प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका व एक्सपेरिंमेंट करायला आवडतात. डिजिटल माध्यमात तुम्हाला ही संधी मिळते. त्यात हल्ली डिजिटलमध्ये फक्त एक प्लॅटफॉर्म नाही आहे. त्यामुळे कलाकारांना खूप सारे पर्याय व संधी उपलब्ध झाली आहे.
'डॅमेज्ड २' या सीरिजबद्दल थोडक्यात सांग?
हा 'डॅमेज्ड' या वेबसीरिजचा दुसरा सीझन असून यात सायकॉलॉजिकल क्राईम ड्रामा आहे. ज्यात सुपरनॅचरल एलिमेंट्सदेखील आहेत. तुम्ही त्याला भूत किंवा सुपर नॅचरल पॉवरही म्हणू शकता. ही कथा आहे गौरी बत्रा व आकाश बत्रा या कपलची. त्यांचे गेस्ट हाऊस असते. तिथे नेहमी लोक राहण्यासाठी येत असतात. एक दिवस तिथे एक जोडपे येते. त्यांच्यासोबत एक मुलगीदेखील असते. ती मुलगी तिथे हरविते. मग, तिचा शोध घ्यायला सुरूवात होते. तेव्हा गौरी बत्रा व आकाश बत्रा यांच्याबद्दल माहित नसलेल्या बऱ्याच गोष्टी समोर येतात. या सगळ्याचा संबंध त्या मुलीशी असतो. या सीरिजमधील प्रत्येक एपिसोड तुम्हाला खिळवून ठेवेल आणि उत्सुकता निर्माण करणारा आहे.
या सीरिजचा तुझा अनुभव कसा होता आणि कोणती गोष्ट चॅलेंजिंग वाटली?
खूप छान अनुभव होता. आम्ही सेटवर खूप मजा केली. या सीरिजमधील स्मोकिंग पार्ट मला खूप चॅलेंजिंग वाटला. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी खऱ्या आयुष्यात केल्या नसतील तर त्या तुम्हाला साकारणं कठीण जातं. त्यामुळे स्मोक करताना मी वास्तविक वाटण्यासाठी प्रयत्न केले आहेत. माझं पात्र गोंधळात टाकणार आहे. तिच्यामध्ये खूप रहस्य दडलेले आहे. हे सीक्रेट बाहेर येऊ नयेत म्हणून ती सिगरेट व दारू व कोकेनचं व्यसन करते. खऱ्या आयुष्यात माझा या गोष्टींना विरोध आहे. पण, या सीरिजमधील सीन्ससाठी धुम्रपान करणं गरजेचे होते. त्यामुळे ते शोपुरते केले.
तुझा बॉलिवूडमध्ये पदार्पण असलेल्या 'हॅक्ड' चित्रपटात काम करण्याची संधी तुला कशी मिळाली?
मला ही संधी समोरून चालून आली. मला 'हॅक्ड' चित्रपटाची कथा खूप आवडली. आजच्या काळातील ही कथा आहे. यात सॅमची कथा रेखाटण्यात आली आहे. सॅमची भूमिका मी साकारली आहे. एक हॅकर तिचे जीवन कसा खराब करतो आणि तिला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मला हा चित्रपट खूप इंटरेस्टिंग वाटला.
तुझ्या करियरमधील टर्निंग पॉइंट भूमिका कोणती आहे?
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अक्षराची भूमिका ही माझ्या करियरमधला टर्निंग पॉइंट ठरला. माझ्या करियरची सुरूवात ये रिश्ता क्या कहलाता है पासूनच झाली आणि नुकतेच या मालिकेला व मला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मी आज जे काही आहे त्यात अक्षरा भूमिकेचा खूप मोठा वाटा आहे.
आगामी प्रोजेक्टबद्दल सांग?
आगामी प्रोजेक्टबद्दल लवकरच कळेल. आता सांगणंं योग्य ठरणार नाही.