चिरागची भूमिका ही वजनदार

By Admin | Published: November 6, 2016 03:46 AM2016-11-06T03:46:17+5:302016-11-06T03:46:17+5:30

क्रिकेट क्षेत्रात आपल्या खेळाने संदीप पाटील यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकाची जबाबदारीही पार पाडली.

The role of lamp is only weighty | चिरागची भूमिका ही वजनदार

चिरागची भूमिका ही वजनदार

googlenewsNext

- Benzeer Jamadar 

क्रिकेट क्षेत्रात आपल्या खेळाने संदीप पाटील यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकाची जबाबदारीही पार पाडली. क्रिकेटचं मैदान गाजवलेल्या क्रिकेटरचा मुलगाही आता चित्रपटसृष्टी गाजवायला सज्ज झाला आहे. चिराग पाटील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाला आहे. लवकरच चिरागचा वजनदार हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाविषयी चिरागने लोकमत सीएनएक्सशी साधलेला मनमोकळा संवाद.

या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी सांगशील?
- या चित्रपटात मी ओंकारच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये मी सई ताम्हणकरच्या पतीची भूमिका साकारत असून तो एका बिझनेसमॅनचा मुलगा असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचे कुटुंबीय नियमांवर आणि तत्वांवर चालणारे असते. अशा या कुटुंबामध्ये सईचे जेव्हा आगमन होते तेव्हा ती कशी ही तत्त्व संभाळते यांची गंमत याचित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटातील दिग्दर्शकासहित तगड्या कलाकारांसोबतच काम करण्याचा अनुभव कसा होता?
- या सर्व तगडया कलाकारांचा विचार करून मला आधी वाटले की, या चित्रपटाच्या सेटवर माझे खूप अवघड असणार आहे. मात्र दिग्दर्शक सचिन यांना भेटून माझी ही भीती पूर्णपणे दूर झाली होती. तर सई ही माझी जुनी मैत्रिण असल्याने तिच्यासोबत आधीपासूनच चांगले बाँन्डिग होते. प्रिया आणि सिध्दार्थ हे दोघे देखील खूप मन मिळावू असल्यामुळे त्यांच्याशी ही माझे चांगले ट्युनिंग जमले. तसेच वजनदारच्या संपूर्ण टीमने मला कधी ही जाणवू दिले नाही की, मी या इंडस्ट्रीत नवा आहे.
वडील संदीप पाटील हे क्रिकेट क्षेत्रात असताना तू अभिनय क्षेत्राची निवड का केलीस?
- मला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. आई आणि बाबांनी करिअर निवडण्याबाबत स्वातंत्र दिले होते. त्यांनी सुरुवातीपासून मला माझ्या आवडत्या क्षेत्रात करिअर कर असेच सांगितले होते. तू जे करशील त्यासाठी आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत असे मला सांगितले होते. खूप कमी लोक असतात ज्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. त्यांच्यापैकी मी एक असल्याने मला त्याचा आनंद आहे.
असे म्हणतात की, सेलिब्रिटींच्या मुलांना जास्त स्ट्रगल करावे लागत नाही यावर तुझे काय म्हणणे आहे?
- मी तर म्हणेण, उलट सेलिब्रिटींच्या मुलांना जास्त मेहनत करावी लागते. कारण मी देखील प्रत्येक चित्रपटासाठी आॅडिशन दिले आहे. फक्त सेलिब्रिटींचा मुले असून चालत नाही. तर त्यासाठी तुमच्यात टॅलेंटदेखील असणे महत्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात मेहनतीशिवाय पयार्य नसतो. मेहनत करा, यश मिळवा असाच माझ्या करिअरचा फंडा आहे.
मालिका,मराठी आणि बॉलिवूड चित्रपट याविषयी तुझे मत काय आहे?
- छोटा आणि मोठा पडदा असे काही मी मानत नाही. चांगली स्क्रिप्ट आणि भूमिका असेल तर मालिकादेखील पुन्हा करण्यास मी तयार आहे.त्यामध्ये मला कोणताही कमीपणा वाटत नाही. तसेच बॉलिवूडचं म्हणाल तर, मराठी इंडस्ट्री सध्या इतकी पुढे गेली आहे की, बॉलिवूड चित्रपट करावेसे मला वाटत नाहीयेत.

Web Title: The role of lamp is only weighty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.