‘रूस्तम’ : ‘नो’ दम
By Admin | Published: August 12, 2016 08:39 AM2016-08-12T08:39:47+5:302016-08-12T08:42:33+5:30
‘रूस्तम’ प्रेक्षकांची अतिशय निराशा करणारा चित्रपट आहे, हे सुुरुवातीलाच स्पष्ट केलेले बरे.
जान्हवी सामंत
चित्रपट : रूस्तम
कलाकार : अक्षय कुमार, इलियाना डिक्रूझ, ईशा गुप्ता, अर्जन बाजवा, पवन मल्होत्रा
स्टार : **
‘रूस्तम’ प्रेक्षकांची अतिशय निराशा करणारा चित्रपट आहे, हे सुुरुवातीलाच स्पष्ट केलेले बरे. खरे तर ड्रामा, सस्पेन्स, रोमान्स असा सर्व मसाला असलेल्या कथेवर आधारित हा चित्रपट कितीतरी अधिक इंटरेस्टिंग करता आला असता. पण नानावटी हत्या प्रकरणावर ( नौदल अधिकारी कवस नानावटीने पत्नीचा प्रियकर प्रेम अहुजा याची केलेली हत्या) आधारित हा चित्रपट अगदीच निराश करून जातो. रूस्तम पावरी एक प्रतिष्ठित नौदल अधिकारी असतो. बºयाच महिन्यानंतर कर्तव्यावरून घरी परतल्यावर पत्नी सिन्थियाचे विक्रम माखिजा नावाच्या पुरूषाशी बºयाच दिवसांपासून प्रेमसंबध असल्याचे त्याला कळते. रागाच्या भरात रूस्तम विक्रमच्या घरी जातो आणि एकापाठोपाठ एक अशा तीन गोळ्या त्याच्या छाताडात डागतो. यानंतर स्वत:हून थेट पोलिसांपुढे जात आत्मसमर्पण करतो. रूस्तमने केले ते बरोबर होते का? तो रागाच्या भरात विक्रमची हत्या करतो की जाणीवपूर्वक? सिन्थियाने रूस्तमशी प्रतारणा का केली? याच प्रश्नांसोबत सुरु होतो तो खटला. न्यायालयापुढे रूस्तम आरोपी म्हणून उभा होतो पण मीडियाच्या इंटरेस्टमुळे लोकांची आणि न्यायालयाची सहानुभूती प्रामाणिक आणि देशभक्त असा लौकीक असलेल्या रूस्तमकडे वळते. खºयाखुºया नानावटी प्रकरणात सगळ्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करून केवळ लोकांच्या दबावापोटी नानावटीला निर्दोष सोडले गेले. पण ‘रूस्तम’मध्ये कथेला वेगळे वळण मिळते आणि चित्रपट वेगळ्या अंगाने वळतो. पण तरिही ‘रूस्तम’ प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत नाही. मुळात पटकथेतच दम नसल्याने चित्रपट भरकटतो. खरे तर माहित असलेली कथा असली तरी तितकीच खळबळजनक आहे. ती रंगवली असती तर अधिक मजा आली असती. आजच्या मॉडर्न रोमान्सच्या काळात या कथेत नैतिकतेच्या आधारावर सांगण्यासारखे बरेच काही होते. विशेषत: सिन्थियाच्या व्यक्तिरेखेस व्यक्त करण्यास बराच वाव होता. हत्या झाल्यानंतर चित्रपटात काहीच उलगडत नाही. रूस्तमचा प्रचंड राग, दु:ख, सिन्थियाची अपराधीपणाची भावना आणि आत्मक्लेष यामुळे प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती निर्माण व्हायला हवी. पण पात्रांची मांडणीच कमजोर असल्याने अशी कुठलीही सहानुभूती प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत नाही. यापूर्वीच्या याच विषयावर आधारित ‘ये रास्ते है प्यार के’ आणि ‘गुमराह’ हे दोन्ही चित्रपट ‘रूस्तम’पेक्षा अधिक प्रगल्भतेने आणि संवेदनशीलपणे हाताळले गेलेत, हे अक्षय कुमारचा हा चित्रपट पाहिल्यानंतर जाणवते. रूस्तमच्या भूमिकेत अक्षयला करण्यासारखे यात काहीच नाही. इलियाना रडण्याखेरिज आणि ईशा गुप्ताला सिगारेट फुंकण्याखेरिज काही काम नाही. संवादापेक्षा या दोघींचे ड्रेसच अधिक चांगले आहेत. मध्यांतरापूर्वी चित्रपट उगाच लांबतो आणि मध्यांतरानंतर अगदीच रटाळ वाटायला लागतो. स्पष्टच सांगायचे तर अक्षयचे चाहते नसाल तर चित्रपट न पाहिलेलाच बरा.