सचिन पिळगांवकर म्हणातयेत ‘लव्ह यू जिंदगी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 02:42 PM2018-09-26T14:42:55+5:302018-09-26T14:44:43+5:30
वय विसरून बेभान होणाऱ्या याच तरूण मनांना आपल्याकडे आकर्षित करणारा ‘लव्ह यू जिंदगी’ हा चित्रपट 14 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
कुणाला आनंद वयाप्रमाणे वागण्यात मिळतो तर कुणाला वय विसरून वयात आल्यासारखं वागण्यात... इथूनच सुरू होतात गंमती-जमती... आणि शेवटी या दोघांच्याही तोंडी शब्द येतात ‘लव्ह यू जिंदगी’...! याच प्रत्येकाची कथा एस. पी. प्रॉडक्शन्स निर्मित आगामी मराठी सिनेमा 'लव्ह यू जिंदगी' मधून पाहायला मिळणार आहे. ज्याचं पोस्टर नुकतंच सोशल मीडिया च्या माध्यमातून लाँच करण्यात आलं.
या पोस्टरवर वरिष्ठ नागरिकांच्या विभागात मोडणारा एक सामान्य गृहस्थ दिसतो . हा गृहस्थ दुसरा कोणीही नसून चिरतारूण्याचंचं वरदान लाभलेले आपल्या सगळ्यांचेच लाडके सचिन पिळगांवकर आहेत. या पोस्टर च वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण पोस्टरवर वेगवेगळ्या भाषांमध्ये दिसणारं प्रेम.
एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली आहे. तर गेली 17 वर्ष झी टीव्ही, झी सिनेमा आणि झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मनोज सावंत या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. दिग्दर्शनाबरोबरच कथा आणि पटकथालेखन ही मनोज सावंत यांनी केलं आहे. वय विसरून बेभान होणाऱ्या याच तरूण मनांना आपल्याकडे आकर्षित करणारा ‘लव्ह यू जिंदगी’ हा चित्रपट 14 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सचिन पिळगांकर सध्या युट्युबवरील त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहे. ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ हे गाणे सोशल मीडियावर काहीच दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले आहे. युट्यूबवर शेमारू कंपनीच्या ‘शेमारू बॉलीगोली’ या अकाऊंटवरून १६ ऑगस्ट रोजी ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. मुंबईच्या जीवनशैलीवरील असलेले हे गाणे स्वतः सचिन पिळगांवकर यांनी गायले आहे.
या गाण्याची शब्दरचना ही मोहम्मद अकील अन्साली यांचे असून व्हिडिओचे दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविडने केली आहे तर निर्मिती मन्नत फिल्मसने केली आहे.
या व्हिडीओखालील डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिओविषयी लिहिण्यात आले आहे की, मुंबई शहरामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. हे शहर अफलातून आणि भन्नाट आहे. मुंबई शहराची हीच वैशिष्ट्ये या गाण्यामधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’