खाकी वर्दीतल्या ‘माणसा’ची व्यथा
By Admin | Published: February 6, 2016 02:31 AM2016-02-06T02:31:49+5:302016-02-06T11:37:44+5:30
नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र ‘ड्यूटी’ बजावणारा पोलीस हासुद्धा एक माणूस आहे आणि त्याच्याकडे ‘माणूस’ म्हणून पाहायला लावणारा ‘पोलीस लाइन’ हा चित्रपट आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र ‘ड्यूटी’ बजावणारा पोलीस हासुद्धा एक माणूस आहे आणि त्याच्याकडे ‘माणूस’ म्हणून पाहायला लावणारा ‘पोलीस लाइन’ हा चित्रपट आहे. या कथेतून पोलीस या समाजाच्या एका महत्त्वाच्या घटकाविषयी संवेदनशीलतेने विचार केलेला आढळतो. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्थितीवर हा चित्रपट अचूक बोट ठेवत असला, तरी मांडणीत मात्र तो साधारण पातळीवर येतो. पण खाकी वर्दीतल्या ‘माणसा’ची व्यथा मांडण्याचे श्रेय मात्र या चित्रपटाला द्यावे लागेल.
‘पोलीस लाइन’ म्हणजे पोलिसांची वसाहत; जिथे या पोलिसांचा परिवार राहतो. अशाच एका वसाहतीतल्या बाळा नामक तरुणाची ही कथा आहे. जरी हा बाळा या चित्रपटाचा हीरो असला, तरी हा चित्रपट एकूणच पोलिसांचे रोजचे जगणे चितारत जातो आणि मग ही कथा केवळ या बाळापुरती उरत नाही. पोलिसांचे जीवन रेखाटणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे आणि तो समोर येण्यासाठी एक कथा हवी, म्हणून हा चित्रपट केला असल्याचे स्पष्ट होत जाते.
पोलिसांच्या व्यथा, त्यांची होणारी घुसमट हे सर्व काही या चित्रपटात आहे आणि त्यांच्या या वेदनेला वाचा फोडण्याचा प्रयत्न लेखक दीपक पवार आणि दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी केला आहे. चित्रपटातला काळ साधारण १९९२ चा आहे आणि त्यानुसार काळाचे पेललेले व्यवधान लक्षात येत जाते. यात वापरलेली त्या काळातली सिनेमांची पोस्टर्स, रेडिओ, टीव्हीवरच्या बातम्या, पेजर फोन इत्यादी गोष्टींनी वातावरणनिर्मिती छान साधली आहे. पण हे सर्व ठीक असले, तरी एक चित्रपट म्हणून ही कथा ठसवताना त्याची पटकथा व मांडणी मात्र साधारण झाली आहे. काही प्रसंगांची संगती लागत नाही; तर काही प्रसंग ओढूनताणून आणल्यासारखे वाटतात. आयटम सॉँग वगैरे हवेच, म्हणून केवळ यात घातले आहे. बाकी काही नाही. खरे तर इतका संवेदनशील विषय हाती असताना, तो तितक्याच जोरकसपणे समोर ठेवला जाणे अपेक्षित होते. मात्र तसे होता होता राहून गेले आहे.
चित्रपटात कलावंतांची फौज आहे. यातली बाळाची मुख्य भूमिका संतोष जुवेकर याने त्याच्या नेहमीच्या स्टाईलने केली आहे आणि इतर व्यक्तिरेखा साकारणारे सतीश पुळेकर, विजय कदम, प्रमोद पवार, जयवंत वाडकर, प्रदीप कबरे, निशा परुळेकर, नूतन जयंत, स्वप्निल राजशेखर अशा अनेक कलावंतांचे टीमवर्क जमून आले आहे. पोलिसांकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लावणारा हा चित्रपट आहे; मात्र त्याची मांडणी अजून दमदार असती, तर हा चित्रपट मनात अधिक ठसला असता. च्‘पोलीस लाइन’ म्हणजे पोलिसांची वसाहत; जिथे या पोलिसांचा परिवार राहतो. अशाच एका वसाहतीतल्या बाळा नामक तरुणाची ही कथा आहे. जरी हा बाळा या चित्रपटाचा हीरो असला, तरी हा चित्रपट एकूणच पोलिसांचे रोजचे जगणे चितारत जातो आणि मग ही कथा केवळ या बाळापुरती उरत नाही. पोलिसांचे जीवन रेखाटणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे आणि तो समोर येण्यासाठी एक कथा हवी, म्हणून हा चित्रपट केला असल्याचे स्पष्ट होत जाते.