"मंटो"विषयी लोकांना माहिती नसणं दु:खद
By Admin | Published: April 3, 2017 03:13 AM2017-04-03T03:13:58+5:302017-04-03T03:13:58+5:30
रुपेरी पडदा, छोटा पडदा आणि वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रसिका दुग्गल
-सुवर्णा जैन
रुपेरी पडदा, छोटा पडदा आणि वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रसिका दुग्गल. तहान या सिनेमापासून रसिकानं बॉलिवूडमध्ये एंट्री मारली. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. आपल्या सशक्त आणि दमदार अभिनयानं विविध सिनेमांतील आव्हानात्मक भूमिका रसिकानं लीलया पेलल्या. आता पुन्हा एकदा रसिका अशाच एक आव्हात्मक सिनेमात काम करीत आहे. नंदिता दासदिग्दर्शित ‘मंटो’ या सिनेमात रसिकाची लक्षवेधी भूमिका असेल. या सिनेमाच्या निमित्तानं तिच्याशी साधलेला हा खास संवाद-
तू मंटो या सिनेमावर सध्या काम करीत आहेस. या सिनेमाच्या कथेविषयी काय सांगशील आणि सिनेमाची तयारी कशी करीत आहेस ?
- हा सिनेमा प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक सादत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांची लेखनशैली निडर स्वरूपाची अशी होती. हलक्याफुलक्या भाषेचा वापर करून अनेक अवघड गोष्टी त्यांनी सहज समजावल्या आहे. विनोदी अर्थ काय असतो, याचं खरंखुरं दर्शन हे मंटो यांच्या लेखनातूनच होतं. सध्याच्या लेखकांचं झालंय असं की ते इंग्रजीत लिखाण करतात आणि दुसराच कुणी तरी त्याचं हिंदीत भाषांतर करतं. त्यामुळे त्या लिखाणातील मजा किंवा विनोदी अंश निघून जातो, असं मला वाटतं. या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी मंटो यांची भूमिका साकारत असून त्यांच्या पत्नीची म्हणजेच सत्या ही भूमिका मी निभावणार आहे. हा एक बायोपिक सिनेमा आहे. मंटो यांच्या जीवनाविषयी फारशी संग्रहित अशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे लाहोरमध्ये काही तरुणींना भेटले. त्यांच्याकडून मंटो आणि साफिया यांच्याविषयी जाणून घेतलं. त्यावरूनच माझी साफिया ही भूमिका माझ्या अंदाजात साकारण्याचा प्रयत्न करणार आहे. मला विविध साहित्यिकांचं साहित्य, जुन्या कथा वाचायला फार आवडतात. त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी लागणारी सर्व मेहनत मी केली आहे. जवळपास दोन ते तीन महिने मंटो या सिनेमासाठी तयारी मी केली आहे. मंटो यांची विविध पुस्तके मी वाचली आहेत.
मंटो या सिनेमाच्या शूटिंग काळात घडलेला एखादा किस्सा जो शेअर करावा वाटतो ?
मंटो सिनेमाची कथा आजच्या काळाला अनुरूप अशीच आहे. त्यामुळे त्यात भूमिका साकारण्याची संधी मिळणं माझ्यासाठी एक मोठा अनुभव आहे. मंटो हे खूप मोठे साहित्यिक होते. मात्र त्यांच्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. असाच काहीसा प्रकार माझ्या निदर्शनात आला. काही दिवसांपूर्वी मी माज्या मैत्रिणीला भेटले. ती इंग्रजी साहित्य या विषयाची प्राध्यापिका आहे. तेव्हा मी तिला मंटो यांच्याविषयी विचारलं. तेव्हा तिनं मला उलट प्रश्न केला, की कोण आहेत हे मंटो? तिचं हे उत्तर ऐकून खूप वाईट वाटलं. त्या वेळी मी तिला मंटो यांच्याविषयी सगळी माहिती सांगितली. मात्र, एखाद्या इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापिकेलाच मंटो माहिती नसतील तर सामान्यांची कल्पना न केलेलीच बरी. हे खूप दु:खद आहे, असं मला वाटते.
प्रमोशन किती महत्त्वाचे आहे ?
- सध्याच्या जमान्यात सिनेमाचं प्रमोशन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली आहे की काय, असं वाटतं. सिनेमाचे रसिक वाढले आहेत, त्यांची आवडनिवड बदलली आहे. त्यामुळे रसिकांना आपल्या सिनेमाकडे आकर्षित करणं आव्हानात्मक होत चाललं आहे. याच कारणामुळे सिनेमाच्या बजेटपेक्षा प्रमोशन आणि मार्केटिंगचं बजेट जास्त असते. आजच्या जमान्यात प्रसिद्ध कलाकारांनाही त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशन, मार्केटिंगसाठी बराच वेळ खर्च करावा लागतो. काय करतील बिच्चारे कारण जमानाच प्रमोशनचा आहे.
रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावर काम करण्याविषयी तुझं काय मत आहे ?
- रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरही मी सध्या काम करते आहे. पीओडब्ल्यू या मालिकेत मी भूमिका साकारली आहे. मात्र, छोट्या पडद्याचं असं आहे, की याचं शूटिंग दीर्घकाळ चालणारं असतं. कलाकाराची संपूर्ण शक्ती त्यात निघून जाते. मात्र, सोबतच टीव्हीवर काम करण्याचा फायदाही आहे. छोटा पडदा तुम्हाला एक कलाकार म्हणून सशक्त बनवतो. टीव्हीवरील मालिकेतील एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी बराच वेळ मिळतो, ती भूमिका तुम्ही जगू लागता असं मला वाटतं. छोट्या पडद्यावर काम करताना मला बरंच काही शिकायला मिळालं. असं असलं तरी मी फक्त सेटवर एक कलाकार आहे. कोणतीही भूमिका साकारताना मी त्या भूमिकेत शिरत नाही. कारण कलाकार म्हणून स्विचआॅन, स्विचआॅफ होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. छोट्या पडद्यावरील मालिकेच्या शुटिंगच्या निमित्ताने विविध ठिकाणी शूटिंगचे अनुभव येतात. मला मात्र मुंबईबाहेर शूटिंग करणं विशेष भावतं. कारण मुंबईतल्या मुंबईत शूटिंग करणं कठीण होऊन जातं.
तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी जाणून घ्यायला आवडेल ? तुझा ड्रीम रोल कोणता असेल ?
- "मंटो" या सिनेमाचं शूटिंग जुलै महिन्यांपर्यंत संपेल असं मला वाटतं. जुलैपासून गौरव बक्षी यांच्या राजकारणाची पार्श्वभूमी असलेला मात्र त्याला रोमँटिक टच असलेल्या सिनेमावर काम करणार आहे. विविध प्रकारच्या आव्हानात्मक भूमिका साकारण्याची इच्छा आहे. मात्र, अमृता प्रीतम यांची भूमिका साकारण्याची माझी इच्छा आहे. हा माज्यासाठी ड्रीम रोल असेल.