सोशल मीडियावरील ट्रोलर्सविषयी हे आहे सई ताम्हणकरचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 07:07 PM2019-03-08T19:07:11+5:302019-03-08T19:12:31+5:30
‘पॉवर ऑफ डिजीटल वर्ड ऑफ माउथ’ या विषयावर सई ताम्हणकरने आपले विचार मांडले.
डिजीटल डिटॉक्सवरून नुकत्याच परतलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरला वीस्क्वेअर डिजीटल इन्फ्ल्युएन्सर कॉनक्लेवसाठी विशेष आमंत्रण होते. भारतातल्या पहिल्या इन्फ्ल्युएन्सर मार्केटिंग कॉनक्लेव्हमध्ये उपस्थित महिलांवर सई ताम्हणकरने आपल्या प्रभावी विचारांनी ठसा उमटवला. ‘पॉवर ऑफ डिजीटल वर्ड ऑफ माउथ’ या विषयावर सईने आपले विचार मांडले.
महिला दिन साजरा करण्याविषयीचे विचार मांडताना सई म्हणाली, “महिला दिनी पुरुष आणि महिला असा भेदभाव न करता, एकत्र येऊन दोघांच्याही शक्तीस्थानांचा योग्य विचार व्हायला हवा. महिला दिन म्हणजे पुरुषांना कमी लेखण्यासाठी किंवा हिन वागणूक देण्यासाठी नसून महिला दिन आपल्याला आठवण करून देण्यासाठी आहे की, आपण खूप कर्तृत्ववान, कर्तबगारी आणि सुंदर आहात. तुम्ही दैवी देणगी आहात आणि हे लक्षात ठेवून ध्येयाकडे आपल्याला वाट शोधत पोहोचायचे आहे. सृजनाची क्षमता असलेल्या बाईला जगात अशक्य असं काहीच नाही असं मला वाटतं.”
सोशल मीडियाविषयी सुद्धा सईने आपली परखड मतं मांडली. ती म्हणाली, “सोशल मीडियावर पोस्ट टाकताना सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा त्यातून दिसणं मला महत्वाचा वाटतं. त्यामुळे मी जशी वैयक्तिक जीवनात आहे, तसाच माझा वावर सोशल मीडियवरही असतो.”
ट्रोलिंगविषयी विचारल्यावर सई ताम्हणकर म्हणाली, “मी ट्रोलर्सकडे जास्त लक्ष देत नाही. आपण ट्रोलर्सना ओळखतही नसतो. तेव्हा चेहरा नसलेल्या व्यक्तिंना किती महत्व द्यायचं हे तुम्हाला कळायला हवं.”
सोशल मीडियाविषयी उत्सुकता असली तरीही अजूनही अनेक महिला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाहीत. ती अशा महिलांना उद्देशून म्हणाली, “सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम असून अनेक टॅलेंटेंड महिलांना ते आपल्या व्यवसायवृद्धीसाठी वापरता येऊ शकेल याविषयी माहिती नाही. अशा सर्व कर्तृत्ववान महिलांना मी या नव्या माध्यमाचा पूरेपूर वापर करायचा सल्ला देईन.”
अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे.