सईच्या 'दिल मे बजी गिटार' गाण्यात श्रेयस तळपदेची एन्ट्री, 16 वर्षांनी ऑनस्क्रीन एकत्र दिसली जोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 03:17 PM2024-01-19T15:17:57+5:302024-01-19T15:22:38+5:30
चाहत्यांना थेट १६ वर्षांपूर्वी आलेल्या 'सनई चौघडे' सिनेमाचीच आठवण झाली.
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा (Saie Tamhankar) आगामी 'श्रीदेवी प्रसन्न' हा मराठी सिनेमा रिलीज होतोय. यामध्ये सई आणि सिद्धार्थ चांदेकरची जोडी जमली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. तसंच सई आणि सिद्धार्थची केमिस्ट्रीही आवडली आहे. सिनेमातील आणखी एक नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात चक्क अभिनेता श्रेयस तळपदेही (Shreyas Talpade) दिसत आहे. सई आणि श्रेयसला ऑनस्क्रीन एकत्र पाहून चाहत्यांना 'कांदे पोहे' गाण्याचीच आठवण झाली आहे.
2008 साली 'सनई चौघडे' हा मराठी सिनेमा रिलीज झाला होता. सुबोध भावे, श्रेयस तळपदे, संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, आणि सई ताम्हणकर असा हा मल्टिस्टारर सिनेमा होता. सिनेमा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला होता. तसंच सर्वांचा अभिनयही उत्तम होता. याच सिनेमातलं 'कांदे पोहे' हे गाणं आज इतक्या वर्षांनीही सतत लोक गुणगुणत असतात. शिवाय सिनेमातील 'शा ना ना' या गाण्यात सई आणि श्रेयस तळपदेची रोमँटिक केमिस्ट्री दिसली होती. आता तब्बल १६ वर्षांनी सई आणि श्रेयस पुन्हा एका गाण्यात दिसत आहेत. 'श्रीदेवी प्रसन्न' मधील 'दिल मे बजी गिटार' हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय. यामध्ये सिद्धार्थ आणि सई यांची जोडी असली तर गाण्याच्या शेवटच्या कडव्यात श्रेयस तळपदेचीही एन्ट्री होते. तेव्हा सई आणि श्रेयसची केमिस्ट्री पु्न्हा एकदा बघायला मिळत आहे.
'श्रीदेवी प्रसन्न' मधील या गाण्याला काही वेळातच हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच श्रेयस तळपदेचं सरप्राईज चाहत्यांच्या पसंतीस पडलं आहे. गाण्यात श्रेयसच भाव खाऊन गेला आहे अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत. तसंच सिद्धार्थचा हँडसम लूक आणि सईचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते फिदा झालेत.
2 फेब्रुवारी रोजी 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमा रिलीज होतोय. सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे.