सई मांजरेकरने सलमान खानच्या 'दबंग 3' चित्रपटातून का केला डेब्यू? म्हणाली- 'पहिली संधी नेहमीच...'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 10:05 AM2024-06-02T10:05:11+5:302024-06-02T10:06:09+5:30
सई निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे.
महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर हे नाव आता बॉलिवूडमध्ये चांगलंच फेमस झालंय. सई मांजरेकर हिने अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग 3' या चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू केला. सिनेमातील तिच्या भुमिकेला प्रेक्षकांनी पसंत केलं होतं. नुकतेच एका मुलाखतीमध्ये सईने 'दबंग 3' सिनेमामधूनच का डेब्यू केला, यामागचे कारण सांगितलं.
सई निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे. नुकतेच तिनं दैनिक जागरणशी संवाद साधला. यावेळी सईनं तिचा पहिला चित्रपट 'दबंग 3' विषयी भाष्य केलं. ती म्हणाली, 'इंडस्ट्रीत प्रत्येकासाठी वेगवेगळ्या गोष्टी काम करतात. प्रत्येकाचा स्वतःचा प्रवास असतो. जर मी माझ्या प्रवासाबद्दल बोलले तर माझ्यासाठी एक मोठा लॉन्च आवश्यक होता. पहिली संधी नेहमीच खास असावी'.
सई मांजरेकरने ती चित्रपटांची निवड कशी करते हेही सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, 'प्रत्येकाची वैयक्तिक निवड असते. एखादे मोठे प्रोडक्शन हाऊस तुमची मेहनत लोकांपर्यंत सहज पोहोचवते. यासोबतच सिनेमाचा आशयही चांगला असायला हवा. कोणताही चित्रपट निवडताना एक चांगली कथा असली पाहिजे. त्यात माझी भूमिका महत्त्वाची असली पाहिजे, ज्यामुळे मी कम्फर्ट झोनमधून बाहेर निघाली पाहिजे, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत'.
पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतर संपूर्ण चित्रपटाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्यास तयार आहेस का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर सई म्हणाली, ' संपूर्ण चित्रपटाची जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण तेव्हाच, जेव्हा प्रेक्षक माझ्यासाठी तयार असतील. सर्व कलाकार हे चित्रपटाची जबाबदारी घेण्यास तयार असतात. परंतु त्याआधी त्यांना सर्वप्रथम प्रेक्षकांचे प्रेम आणि आदर मिळणे आवश्यक आहे'.
सई मांजरेकर अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहे. अभिनेत्री म्युझिक अल्बममध्ये देखील झळकली आहे. विशेष म्हणजे नवोदित अभिनेत्री असूनही तिने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. सईचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर निर्माते साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान नाडियादवालासोबत सईचे अफेअर असल्याची चर्चा आहे.