अनोळखी व्यक्तीला रस्त्यात चावला होता सैफ अली खान; 'या' कारणामुळे अभिनेत्याने केलं होतं असं वर्तन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 12:12 PM2024-04-15T12:12:26+5:302024-04-15T12:15:42+5:30
Saif ali khan: कारने निघालेला सैफ अचानक वाटेत उतरला आणि तो एका व्यक्तीशी जोरजोरात भांडायला लागला.
बॉलिवूडचा नवाब हे बिरुद मिरवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सैफ अली खान (saif ali khan). आजवरच्या कारकिर्दीत सैफने अनेक सुपरहिट सिनेमाबॉलिवूडचा दिले आहेत. इतकंच नाही तर त्याने इंडस्ट्रीचा ९० चा काळ तर चांगलाच गाजवला आहे. सध्या सोशल मीडियावर सैफचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. सैफ भररस्त्यात एका अनोळखी व्यक्तीला चक्क चावला होता. त्याचा हा किस्सा अभिनेता कमल सदाना याने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे.
अलिकडेच कमल सदाना याने 'सिद्धार्थ कनन'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ९० च्या काळात सैफसोबत घडलेला किस्सा सांगितला. एकदा मी सैफ आणि अमृता एका ठिकाणाहून परत येत होतो त्यावेळी रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीसोबत सैफचं अचानक भांडण सुरु झालं. इतकंच नाही तर तो चक्क त्या व्यक्तीला चावला. पण, काही वेळानंतर अचानकपणे सैफ आणि तो व्यक्ती हसायला लागले आणि एकमेकांना मिठी मारली.
नेमकं काय घडलं होतं सैफसोबत?
"९० च्या काळात माझी सैफ आणि अमृतासोबत खूप छान मैत्री होती. एकदा आम्ही तिघेही एका ठिकाणाहून परत येत होतो. आम्ही आमच्या कारमधून जात होतो आणि त्याच वेळी एक दुसरी कार आम्हाला ओव्हरटेक करुन गेली. त्यावेळी सैफने त्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला काही इशारा केला. त्या व्यक्तीनेही मग समोरुन इशारा केला. त्यानंतर दोघंही आपआपल्या कारमधून उतरले आणि भांडायला लागले. त्यांचं भांडण पाहून मी आणि अमृता कारमधून खाली उतरलो. त्या माणसाचे कुटुंबीय सुद्धा गाडीतून खाली उतरले. पण, त्या दोघांच्या भांडणात कोणीही पडायला तयार नाही. त्या दोघांची भांडणं इतकी झाली की, ते एकमेकांना चावले. त्यानंतर त्यांचं भांडण थांबलं आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारली", असं कमल सदाना याने सांगितलं.
पुढे तो म्हणतो, "त्यांचा हा प्रकार पाहून आम्ही सगळेच हसू लागलो. त्यांचं भांडण संपल्यावर आम्ही सैफला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्याला टीटीचं इंजक्शन दिलं."
दरम्यान, सैफचं ज्या व्यक्तीसोबत रस्त्यात भांडण झालं होतं तो व्यक्ती सैफचा जुना मित्र होता. आणि, जेव्हा कधी ते एकमेकांना भेटायचे त्यावेळी ते अशाच पद्धतीने वागायचे असंही कमल सदाना याने म्हटलं.