"सलाम महात्म्या सलाम...", किरण मानेंनी गांधी जयंती निमित्त शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 11:41 AM2024-10-02T11:41:49+5:302024-10-02T11:43:05+5:30

Kiran Mane : गांधी जयंतीनिमित्त किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

"Salam Mahatmya Salam...", Kiran Mane shared a special post on the occasion of Gandhi Jayanti | "सलाम महात्म्या सलाम...", किरण मानेंनी गांधी जयंती निमित्त शेअर केली खास पोस्ट

"सलाम महात्म्या सलाम...", किरण मानेंनी गांधी जयंती निमित्त शेअर केली खास पोस्ट

किरण माने (Kiran Mane) हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'तून ते घराघरात लोकप्रिय झाले. 'मुलगी झाली हो' या मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. सध्या ते 'तिकळी' या मालिकेत काम करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असणारे किरण माने बऱ्याचदा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर आपले मत मांडत असतात. दरम्यान आता त्यांनी गांधी जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी महात्मा गांधींचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ...माणूस दिसायला हडकुळा होता. किरकोळ शरीरयष्टी. छातीचा पिंजरा दिसत होता... पण माझ्या भावा, त्या छातीत असा दम होता की आजसुद्धा अख्खं जग त्याला झुकून सलाम करतं ! ही होती फक्त विचारांची ताकद. अमेरिका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया... पृथ्वीवरच्या कुठल्याबी देशात जा.. कुठंही... आज गांधीबाबाच्या विचारांनी प्रभावित झालेली तर त्यांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झालेली दिसतीलच... पण त्यांची एरवी निंदानालस्ती करणार्‍यांनाबी त्याच्यापुढं मान खाली घालून वाकून झुकावं लागलेलं दिसतं.

मानवतेची कास होती...

पुढे लिहिले की, एखादा नेता कितीही ओरडून बोलला - घसा फाडूफाडून बोलला - प्रोपोगंडा पिक्चर काढून डाॅल्बी डिजीटलवर बोलला... तरी त्याच्या बोलण्यात 'सत्याचा अंश' नसेल तर जगाच्या बाजारात त्या बोलण्याला घंटा किंमत मिळत नसते. या महात्म्याचा आवाज खणखणीत नव्हता की चालण्यात रूबाब नव्हता.. वाकून काठी टेकत-टेकत हज्जारो लोकांसमोर तो यायचा.. पालथी मांडी घालून बसायचा आणि बसक्या आवाजात बोलत रहायचा. आवाजात चढउतार नाहीत की टाळीबाज-चटपटीत वाक्यं नाहीत... पण त्याच्या विचारांत 'निर्मळ'पणा होता - शब्दाशब्दांत भारतमातेवरची माया होती - रक्ताच्या थेंबाथेंबात आपल्या मातीतल्या गोरगरीबांसाठीची आस होती - मानवतेची कास होती - 'सत्याची' ताकद होती.


गोळ्या घालुन मारला बाबाला... पण तरीबी जिवंत राहिला. शत्रूच्या नाकावर टिच्चून. जगातला एक देश असा नाही जिथं त्याचा विचार पोचला नाही. खायचं काम नाही गड्याहो... ह्यांच्या हज्जार पिढ्या खपतील तो 'विचार' संपवायला पण 'गांधी' उसळी मारून वर येतच रहाणार. सलाम महात्म्या सलाम... कडकडीत सलाम.., असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. 

Web Title: "Salam Mahatmya Salam...", Kiran Mane shared a special post on the occasion of Gandhi Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.