"भावा, India बरोबर १२ तारखेला खेळताना...", अमेरिकेच्या मराठमोळ्या क्रिकेटर सौरभसाठी सलील कुलकर्णींची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 04:34 PM2024-06-07T16:34:16+5:302024-06-07T16:34:48+5:30
क्रिकेटर असण्याबरोबरच सौरभ एक उत्तम गायकही आहे. पाकिस्तान विरुद्ध अमेरिका सामन्यानंतर सौरभचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
T20 वर्ल्ड कपला नुकतीच सुरुवात झाली आहे. गुरुवारी(६ जून) झालेल्या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला धूळ चारली. या सामन्यात मुळचा भारतीय असलेला मुंबईकर सौरभ नेत्रावळकर हिरो ठरला. सौरभने सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेला ५ धावांनी विजय मिळवून दिला. कालच्या सामन्यामुळे सौरभ चर्चेत आला आहे. क्रिकेटर असण्याबरोबरच सौरभ एक उत्तम गायकही आहे. पाकिस्तान विरुद्ध अमेरिका सामन्यानंतर सौरभचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
सौरभचा असाच एक व्हिडिओ मराठीतील सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओत तो सलील कुलकर्णी यांचं 'रे क्षणा थांब ना' हे गाणं गाताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ शेअर करत सलील कुलकर्णींनी पोस्ट लिहिली आहे.
सौरभ नेत्रावळकरसाठी सलील कुलकर्णींची पोस्ट
"टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हर खेळून अमेरिकेला जिंकून देणाऱ्या सौरभ नेत्रावळकरने गायलेलं रे क्षणा थांब ना हे गाणं...हा व्हिडिओ पाहताना आनंद होत आहे.
एक सॉफ्टवेअर इंजिनियर ज्याने भारतासाठी अंडर -१९ वर्ल्ड कप खेळला. आणि आता तो अमेरिका क्रिकेट टीमचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा प्रवास त्याच्यासाठी नक्कीच सोपा नसेल. एका प्रोफेशनल महिला क्रिकेटरचे वडील म्हणून मी हे सांगू शकतो...
सौरभ भावा...इंडियाबरोबर १२ तारखेला खेळताना just take it easy .. बाकी एरवी मग तुला full support आहेच...
त्याने हा व्हिडिओ एकदा काय झालं हा अल्बम प्रदर्शित होण्याच्या आधी पोस्ट केला आहे.
सलील कुलकर्णींच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
कोण आहे मुंबईकर मॅचविनर सौरभ नेत्रावळकर?
३२ वर्षीय सौरभ हा मुळचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे. त्याचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ ला मुंबईत झाला. २००८-०९ मध्ये कूचबिहार ट्रॉफीमध्ये त्याने सहा सामन्यांत ३० बळी घेतले. त्यामुळे २०१० च्या अंडर-19 विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१०च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत केएल राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांसारख्या बड्या खेळाडूंसोबत सौरभही टीम इंडियाचा भाग होता. मात्र, त्या अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघ प्लेऑफ फेरीत स्पर्धेबाहेर गेला. सौरभला सहा सामन्यांत ९ विकेट्स घेता आल्या. २५ धावांत तीन बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती आणि इकॉनॉमी रेटदेखील ३.११ होता. असे असूनही, सौरभला टीम इंडियात स्थान देण्यात आले नाही. रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसह इतर स्पर्धांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. पण त्याला संधी मिळालीच नाही. अखेर तो अमेरिकेत निघून गेला आणि सध्या तो अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत आहे. काही काळ तो अमेरिकन संघाचा कर्णधारही होता.