सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 05:03 PM2024-11-05T17:03:47+5:302024-11-05T17:04:48+5:30
मीने सुशांतची हत्या झाल्याचा दावा करण्याबरोबरच डॉक्टरांनी त्याचे पोस्टमोर्टम रिपोर्ट बदलल्याचाही दावा केला आहे.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची Ex गर्लफ्रेंड सोमी अली सध्या चर्चेत आली आहे. सलमानला धमकी देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला सोमी अलीने थेट मेसेज करत भेटण्याची इच्छा व्यक्ती केली होती. भाईजानसाठी मैदानात उतरलेल्या सोमीने सलमानबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. याबरोबरच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचा दावाही सोमीने केला आहे. सोमीने नुकतंच तिच्या चाहत्यांबरोबर ask me सेशन घेतलं. या सेशनमध्ये तिने सुशांतबद्दल मोठा दावा केला आहे.
सोमी अलीने reddit वर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिलं. या सेशनमध्ये सोमीला चाहत्याने सुशांतच्या मृत्यूबद्दल प्रश्न विचारला. "सुशांत सिंह केसबद्दल तुला काय वाटतं? ज्याप्रकारे त्याला बॉलिवूडमध्ये वागणूक दिली गेली ते निराशाजनक आहे", असं चाहत्याने विचारलं. त्यावर उत्तर देताना सोमीने सुशांतची हत्या झाल्याचा दावा करण्याबरोबरच डॉक्टरांनी त्याचे पोस्टमोर्टम रिपोर्ट बदलल्याचाही दावा केला आहे.
"त्याची हत्या केली आणि असं भासवण्यात आलं की त्याने आत्महत्या केली आहे. AIIMS रुग्णालयाचे डॉ. सुधीर गुप्ता ज्यांनी पोस्टमोर्टम रिपोर्ट बदलले त्यांना विचारा", असं सोमीने म्हटलं आहे. सुशांतचा मृत्यू झाला तेव्हादेखील सोमीने "सुशांतने आत्महत्या केली यावर विश्वास बसत नाहीये", असं म्हटलं होतं.
सुशांतने १४ जून २०२० रोजी लॉकडाऊनमध्ये मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं होतं. त्याच्या मृत्यूच्या बातमीने सगळ्यांनाच जबर धक्का बसला होता. सुशांतच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू आत्महत्या केल्याने झाल्याचं म्हटलं गेलं होतं.