Salman Khan : सलमान खानला ६ वर्षांत १२ पेक्षा जास्त वेळा जीवे मारण्याच्या धमक्या; कोणी केलेला फोन?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 02:38 PM2024-10-30T14:38:08+5:302024-10-30T15:23:18+5:30
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या २ वर्षांपासून कडक सुरक्षेत राहत आहे. त्याचं मोठं कारण म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँगकडून त्याला सातत्याने धमक्या येत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या २ वर्षांपासून कडक सुरक्षेत राहत आहे. त्याचं मोठं कारण म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँगकडून त्याला सातत्याने धमक्या येत आहेत. त्याच्या घरावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. याच दरम्यान त्याला सतत मिळणाऱ्या धमक्या पाहता मुंबई पोलिसांनी त्याला वाय प्लस सुरक्षा दिली आहे. यानंतरही वारंवार त्याच्या जीवाला धोका असल्याचे फोन येत आहेत.
दोन कोटी रुपये पाठवा अन्यथा जीवे मारण्याची धमकी सलमानला आता देण्यात आली. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा कॉल आला होता. यानंतर पोलिसांना सतर्क करण्यात आलं आहे. अलीकडच्या काळात सलमान खानला कधी धमक्या आल्या त्याबाबत जाणून घेऊया...
याआधी किती वेळा आल्या धमक्या?
२५ ऑक्टोबर २०२४
२५ ऑक्टोबर २०२४ रोजी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी मंगळवारी नोएडा येथून अटक केली. मोहम्मद तैय्यब (२०) असं त्याचं नाव आहे.
१८ ऑक्टोबर २०२४
१८ ऑक्टोबरला सलमानला धमकीचा फोनही आला होता. या प्रकरणी पोलिसांनी झारखंडमधून आरोपीला अटक केली होती. आरोपीने मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सॲप मेसेजद्वारे आपण लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचं सांगितलं होतं. तसेच सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षाही वाईट होईल असंही म्हटलं.
१४ एप्रिल २०२४
१४ एप्रिल रोजी सकाळी सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स ग्रुपने घेतली. यानंतर सलमानची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली.
जानेवारी २०२४
सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये दोन अज्ञात लोकांनी कुंपणाची तार तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी पकडल्यावर दोघांनी सलमानचे चाहते असल्याचं सांगितलं. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले. या कारणास्तव या दोघांविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला होता.
नोव्हेंबर २०२३
सलमान खानला फेसबुकच्या माध्यमातून ही धमकी मिळाली होती. ही धमकी पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल यांना लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेल्या फेसबुक अकाऊंटवरून देण्यात आली होती, मात्र त्यात सलमान खानच्या नावाचाही उल्लेख होता.
एप्रिल २०२३
एप्रिलमध्ये सलमान खानला १६ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून धमकी देण्यात आली होती. त्याने मुंबई पोलिसांना फोन करून ३० एप्रिल २०२३ ला सलमानला मारणार असल्याचं सांगितलं.
मार्च २०२३
सलमान खानला जोधपूरमधून धमक्या आल्या आहेत. सलमानच्या अधिकृत मेलवर ३ ई-मेल पाठवले होते. त्यात लिहिलं होतं की, सलमान खान पुढचा नंबर तुझा आहे, तू जोधपूरला येताच तुला सिद्धू मूसवालाप्रमाणे मारलं जाईल.
वर्ष २०२२
यावर्षी लॉरेन्स बिश्नोई गँग शूटर संपत नेहराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यानंतर हल्लेखोर त्याच गॅलेक्सी अपार्टमेंटपासून थोड्या अंतरावर असलेल्या जॉगिंग पार्कमध्ये पोहोचले होते, जिथे सलमानचे वडील सलीम खान रोज मॉर्निंग वॉक करायचे. सलीम खान मॉर्निंग वॉकनंतर ज्या बाकावर बसायचे, त्यावर हल्लेखोरांनी धमकीचे पत्र ठेवलं होतं.
२०१९
लॉरेन्स बिश्नोईचा खास शूटर संपत नेहरा यावेळी सलमान खानला मारण्याच्या अगदी जवळ आला होता. त्यानंतर आरोपींनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रेकी केली होती, परंतु त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या शस्त्राची रेंज कमी होती. त्यामुळेच सलमान खानवर हल्ला करण्याचा प्लॅन पुढे ढकलला.
२०१८
जोधपूर कोर्टात सलमान खानला पहिल्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई जोधपूर कोर्टात हजर असताना पहिल्यांदा म्हणाला होता की, आम्ही सलमानला जोधपूरमध्येच मारणार आहोत.