RRR च्या यशावर सलमानकडून राम चरणचं अभिनंदन; म्हणाला, "दक्षिणेत आमचे चित्रपट..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:02 IST2022-03-29T16:00:09+5:302022-03-29T16:02:20+5:30
Salman Khan On Movie RRR : सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असले तरी दक्षिणेकडे मात्र त्यांना चांगली कमाई करता येत नाही.

RRR च्या यशावर सलमानकडून राम चरणचं अभिनंदन; म्हणाला, "दक्षिणेत आमचे चित्रपट..."
बॉलिवूडचा स्टार (Bollywood Star) सलमान खानचे (Salman Khan) अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतात. त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. परंतु त्याच्या चित्रपटांना दक्षिणेकडे मात्र हवं तितकं यश मिळताना दिसत नाही आणि यावर खुद्द सलमाननंच आश्चर्य व्यक्त केलं आहे. नुकतंच सलमाननं पॅन इंडिया फिल्म आणि चिरंजिवी यांच्यासोबत येणाऱ्या आपल्या आगामी चित्रपटावर भाष्य केलं. तसंच हिंदी चित्रपटांमध्ये 'हीरोइज्म' का आवश्यक आहे हेदेखील सांगितलं.
चिरंजीवी यांच्या चित्रपटात आपण विशेष भूमिका साकारत असल्याची माहिती सलमान खाननं दिली. "त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला होता. मी चिरू गारू यांना दीर्घ काळापासून ओळखत आहे. त्यांनी RRR या चित्रपटात उत्तम काम केलंय. मी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि चित्रपटाच्या यशाबद्दल अभिनंदन केलं. ते चांगलं काम करतायत आणि ते पाहून अभिमान वाचतं. परंतु दक्षिण भारतात आमचे चित्रपट चांगली कामगिरी करत नाही हे पाहून आश्चर्य वाटतं," असंही सलमान म्हणाला.
यादरम्यान, आपल्यालाही दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यास आवडत असल्याचं त्यानं सांगिलं. परंतु आतापर्यंत आपल्याला अशा चित्रटांची ऑफर मिळाली नसल्याचंही तो म्हणाला. "जेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा ते तामिळ किंवा तेलुगु चित्रपट घेऊन येत नाही. ते माझ्याकडे हिंदी चित्रपटांसाठी येतात," असंही तो म्हणाला. सलमान आता आपल्या आगामी चित्रपट टायगर ३ मध्ये दिसणार आहे.