सलमान खानने ‘सेल्फी’ काढणाऱ्या 'त्या' फॅनच्या हातातून खेचला मोबाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 04:15 PM2020-01-28T16:15:05+5:302020-01-28T16:15:15+5:30
बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान मंगळवारी (२८) गोव्यात पोहोचल्यानंतर येथे घडलेल्या एका घटनेमुळे ते पुन्हा एकदा बरेच चर्चेत आले आहेत. स
वास्को: बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान मंगळवारी (२८) गोव्यात पोहोचल्यानंतर येथे घडलेल्या एका घटनेमुळे ते पुन्हा एकदा बरेच चर्चेत आले आहेत. सलमान खान दाबोळी विमानतळाच्या बाहेर येत असताना एक तरुण त्यांच्याबरोबर ‘सेल्फी’ काढण्याचा प्रयत्न करत असताना रागाच्या भरात खानने त्या तरुणाचा मोबाईल त्याच्या हातातून खेचून काढल्याने येथे त्यांना पाहण्यासाठी जमा झालेल्या ‘फॅन्स’ (चाहते)नी याबाबत आश्चर्य व्यक्त केले.
सलमान खान ‘सेल्फी’ काढणा-या त्या ‘फॅन’च्या हातातून मोबाईल खेचत असलेला सात सेकंदाचा ‘व्हिडीओ’ विविध सोशल मीडिया ग्रुपवर बराच व्हायरल झाला असून, आपल्या ‘फॅन’शी सलमान खानने अशा प्रकारे उद्धटपणाची वागणूक करून चुकीची गोष्ट केलेली असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली. काही सलमान ‘फॅन्स’ नी त्यांची परवानगी न घेता त्यांच्याबरोबर ‘सेल्फी’ काढण्याचा प्रयत्न करून त्या तरुणाने चुकीची गोष्ट केली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत सुपरस्टार सलमान खान यांची बाजू घेतल्याचे सोशल मीडियावर दिसून आले.
मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास सदर घटना घडली. बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान सकाळी दाबोळी विमानतळावर पोहोचल्यानंतर ते बाहेर येत असताना विमानतळावर काम करणा-या एका तरुणाने त्यांच्या पुढे पुढे चालून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकारावर सलमान खान चिढल्याचे दिसून आले असून बाहेर निघणा-या दरवाजावर त्यांनी त्या तरुणाच्या हातातून त्याचा मोबाईल खेचून काढला. यानंतर तो तरुण मोबाईल मागण्यासाठी त्याच्याशी जात असल्याचे त्या व्हीडिओत दिसून आले.
सलमान खानबरोबर असलेल्या एका तरुणाने सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असलेल्या त्या ‘फॅन’ला धक्का दिल्याचे व्हायरल झालेल्या व्हीडिओत दिसून आले आहे. सद्या ‘सोशल मीडिया’ ग्रुपवर व्हायरल होत असलेल्या या व्हीडियोमुळे सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी दाबोळी विमानतळावरील विश्वसनीय सूत्रांना संपर्क केला असता मंगळवारी सकाळी ७.३०च्या सुमारास सदर घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
सदर प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकात संपर्क केला असता अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती त्यांनी दिली. सदर प्रकाराची घटना जरी घडली तरी याबाबत दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकात अजून कोणीही तक्रार दिली नसल्याची माहिती या पोलीस स्थानकावरील एका अधिकाऱ्यांने दिली. मंगळवारी सकाळी गोव्यात आलेले बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांनी आपल्या ‘फॅन’ शी अशा प्रकारची वागणूक केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्या तरुण ‘फॅन’ च्या हातातून मोबाईल खेचून काढल्यानंतर त्याला तो सुपरस्टार सलमान खान यांनी पुन्हा परत दिला की नाही हे मात्र कळू शकले नाही.