सलमान- प्रभास "या" चित्रपटातून येणार एकत्र ?
By Admin | Published: June 13, 2017 05:15 PM2017-06-13T17:15:26+5:302017-06-13T17:15:26+5:30
एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13- एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. कमाईच्या बाबतीतही या चित्रपटानं सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. बाहुबली 2च्या घवघवीत यशानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या नावाभोवती असलेल्या चाहत्यांची गर्दी कमालीची वाढली आहे. आता प्रभास बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माता करण जोहर प्रभासला बॉलिवूड लाँच करणार होता, अशीही चर्चा होती. सध्या प्रभास हा त्याच्या साहो चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र लवकरच तो हिंदी चित्रपटातही दिसणार असल्याची चर्चा आहे. रोहित शेट्टीच्या अॅक्शन चित्रपटांतून सलमान खान आणि प्रभास हे दोन आघाडीचे अभिनेते एकत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सलमान आणि प्रभास हे दोन्ही अभिनेते एकाच चित्रपटात स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
रोहित शेट्टीने याआधी शाहरुख खान आणि अजय देवगण या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. पण सलमानने मात्र रोहितच्या चित्रपटात काम करण्याविषयी अनुत्सुकता दाखवल्याची सध्या चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून सलमानचे चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहेत. दबंग खानने प्रेक्षकांनाही चांगली भुरळ घातली आहे. मात्र रोहित शेट्टीच्या दिग्दर्शित अॅक्शनपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकलेले नाहीत. त्यामुळे रोहितच्या चित्रपटातून प्रभास आणि सलमान एकत्र येतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.