कंगनाच्या दुहेरी भूमिकेला सलाम
By Admin | Published: May 22, 2015 10:49 PM2015-05-22T22:49:36+5:302015-05-22T22:49:36+5:30
तनु वेड्स मनु ज्यांनी बघितला असेल त्यांना तनु वेड्स मनु रिटर्न पाहण्याचा मोठा आनंद लुटता येईल. मूळ चित्रपटात जो मसाला वापरला होता
तनु वेड्स मनु ज्यांनी बघितला असेल त्यांना तनु वेड्स मनु रिटर्न पाहण्याचा मोठा आनंद लुटता येईल. मूळ चित्रपटात जो मसाला वापरला होता तो सगळा या सिक्वेलमध्येही असल्यामुळे यात भरपूर मनोरंजन आहे. कंगना रानावतने यात प्रभावी अभिनय केला आहे.
मूळ तनु वेड्स मनुचा शेवट जेथे होतो तेथून सिक्वेलची गोष्ट सुरू होते. तनुजा त्रिवेदी (कंगना रानावत) उर्फ तनु आणि डॉक्टर मनोज शर्मा (माधवन) ऊर्फ मनु लग्नानंतर लंडनला राहायला जातात. रोजच्याच कटकटी आणि भांडणांमुळे तनु आणि मनुचे वैवाहिक आयुष्य संपलेले असते. दोघांनाही एकमेकांबरोबर राहायचे नसते. तनुच्या तक्रारीनंतर मनुला वेड्यांच्या रुग्णालयात ठेवले जाते व तनु माहेरी कानपूरला येते. तनुच्या सांगण्यावरून मनुचा मित्र पप्पी (दीपक डोबरियाल) लंडनला जातो आणि मनुला त्या रुग्णालयातून बाहेर काढून आणतो. मनु आपल्या दिल्लीतील घरी येतो. तनुचा खूप राग आलेला मनु तिला घटस्फोटाची नोटीस पाठवितो. तनुच्या घरात भाड्याने राहणारा वकील चिंटू (मो. जिशान अय्यूब) त्यांच्या भांडणाचा फायदा घेत उत्तरात घटस्फोटाला संमती असल्याची नोटीस पाठवून देतो.
आधीच्या चित्रपटात तनुशी लग्न करणारा कंत्राटदार राजा अवस्थी (जिमी शेरगिल) पुन्हा तनुच्या जवळ येऊ लागतो. वास्तविक त्याचे लग्न दुसऱ्या मुलीशी ठरलेले असते. तिकडे तनुमुळे दुखावलेल्या मनुला दिल्लीत मनुसारखीच दिसणारी मुलगी दाखविली जाते. तनुसारखी दिसणारी मुलगी कुसुम (कंगना रानावतची दुहेरी भूमिका) हरियाणाची राहणारी आहे. कुसुमचे लग्न राजा अवस्थीशी ठरलेले आहे, तरीही मनु आणि कुसुम एकदुसऱ्याच्या जवळ येतात व लग्नालाही तयार होतात. तनु आणि राजाला हे समजते तेव्हा ते लग्नाच्या ठिकाणी येऊन धडकतात. मनातून अजूनही तनु मनुवर प्रेम करीत असते, परंतु काही व्यक्त करीत नाही. मनु आणि कुसुम लग्न मंडपात दाखल होतात, परंतु अशा काही घटना
घडतात की तनु आणि मनुचे पुन्हा लग्न होते.
वैशिष्ट्ये : दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी तनु वेड्स मनु ज्या नजाकतीने बनविला होता तेच कौशल्य त्यांनी तनु वेड्स मनु रिटर्नमध्येही ठेवल्यामुळे चित्रपट परिणामकारक बनला आहे. गीते आणि संवादामुळे चित्रपट अधिक रंजक बनविण्यात हिमांशु शर्माची कामगिरी मोठीच आहे. कंगना रानावतने दोन्ही भूमिका समरसून केल्या आहेत. कंगनाच्या उत्तम चित्रपटांत हा सिक्वेल आहे. माधवनने मनुची भूमिका जिवंत केली आहे. या दोघांशिवाय दीपक डोबरियालने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.