ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये शिरलेला तोच हा बिबट्या, आता फिरतोय सिद्धार्थ चांदेकरच्या घरामागे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 05:39 PM2021-06-30T17:39:12+5:302021-06-30T17:39:51+5:30
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या घरामागे काही दिवसांपूर्वी बिबट्या आणि हरीण आले होते आणि त्याने त्याच्या घरातील खिडकीतून ते क्षण कॅमेऱ्यात टिपले होते.
मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या घरामागे काही दिवसांपूर्वी बिबट्या आणि हरीण आले होते आणि त्याने त्याच्या घरातील खिडकीतून ते क्षण कॅमेऱ्यात टिपले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या घरामागे त्याला तो बिबट्या दिसला. त्याने त्याचा व्हिडीओ शेअर करत त्याच्याबद्दल सांगितले आहे.
सिद्धार्थ चांदेकर याने इंस्टाग्रामवर बिबट्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, कोऱ्या. काल रात्री परत आला होता. त्याचे हे नाव पडलेय कोरम मॉल वरून. २०१९ मध्ये ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये हे साहेब शिरले होते. त्याला तिकडून वाचवले आणि एक ट्रॅकिंग चिप बसवून पुन्हा संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सोडून दिले. त्याला वनविभाग वाले एल-८६ म्हणून ओळखतात. माझ्या घरामागे कायम येत असतो हा. आता मित्र झालाय. कोऱ्या. त्याच्यावर लाईट आम्ही मारत नव्हतो. आमच्याकडे अशी बॅटरी नाही. सांगून ठेवलं.
सिद्धार्थ आणि मिताली गोरेगाव पूर्व येथील म्हाडा कॉलनीत राहतात. त्यांच्या इमारतीच्या मागे आरेचे जंगल लागते. त्यामुळे या परिसरात क्वचित जंगलातील प्राणी पहायला मिळतात.
याआधी सिद्धार्थ चांदेकरला बिबट्या दिसला होता. त्यानंतर तो क्षण त्याने कॅमेऱ्यात टिपला आणि इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले होते की, आमच्या बिल्डिंगच्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम दिसली. "तुमच्यामुळे झालंय हे" असं नजरेतून सांगत होता.
बिल्डिंग मधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मी पण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे. त्याचा नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे.