आता या नावाने ओळखली जाणार सना खान, ‘निकाह’नंतर बदलले नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 11:37 AM2020-11-23T11:37:31+5:302020-11-23T11:38:26+5:30
अल्लाहने आम्हाला या जगात एकत्र ठेवावे, स्वर्गातही ही सोबत अशीच राहावी..., असे लिहित सनाने ‘निकाह’ची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
‘अल्लाह’साठी अभिनय आणि ग्लॅमर दुनियेला रामराम ठोकणारी अभिनेत्री सना खान हिने गुपचूप ‘निकाह’ केला. 20 नोव्हेंबरला सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी ‘निकाह’ केला. सूरतमध्ये हा निकाह पार पडला. यानंतर लगेच या ‘निकाह’चे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पाठोपाठ खुद्द सनाने ‘निकाह’नंतरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आता सनाने तिचे नावही बदलले आहे. इन्स्टाग्रामवर तिने नाव बदलून सैय्यद सना खान असे नवे नाव धारण केले आहे.
एकमेकांवर प्रेम केले अल्लाहसाठी... एकमेकांसोबत ‘निकाह’ केला अल्लाहसाठी... अल्लाहने आम्हाला या जगात एकत्र ठेवावे, स्वर्गातही ही सोबत अशीच राहावी..., असे लिहित सनाने ‘निकाह’ची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
सना खानने ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय देत सर्वांना जोरदार धक्का दिला होता. मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी ग्लॅमर दुनिया सोडत असल्याचे तिने जाहिर केले होते. यानंतर सोशल मीडियावरचे स्वत:चे सर्व बोल्ड फोटो तिने डिलीट केले होते.
अल्लाहसाठी घेतला सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय
‘आज मी आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळवणार पोहोचली आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. या काळात मला पैसा, प्रतिष्ठा, प्रेम सगळे काही मिळाले. चाहत्यांकडून मिळालेल्या या सर्वगोष्टींसाठी मी त्यांची आभारी आहे. पण काही दिवसांपासून एक वेगळाच प्रश्न पडला होता. पैसा, प्रसिद्धी मिळवणे हेच जगात येण्याचे उद्दिष्ट आहे का? जे निराधार, अनाथ आहेत अशांसाठी आपले काहीच कर्तव्य नाही का? मृत्यू कधीही गाठू शकतो आणि मेल्यानंतर आपले काय; हा विचार आपण करायला नको? या प्रश्नांची उत्तरं मी शोधतेय. विशेषत: मरणानंतर माझे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर मी शोधते आहे.
त्यामुळे आज मी घोषणा करते की, आजपासून मी बॉलिवूड इंडस्ट्रीतील आयुष्य सोडून मानवता आणि अल्लाहच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेते आहे. माझ्या सर्व बहिण-भावांना विनंती करते की, यापुढे इंडस्ट्रीतील कोणत्याही गोष्टीसाठी मला निमंत्रण देऊ नये. खूप खूप आभार,’असे लिहित तिने आपला निर्णय जगाला कळवला होता.