‘रेती’ माफियांच्या भेसूर चेहऱ्याचा वेध
By Admin | Published: April 9, 2016 01:35 AM2016-04-09T01:35:26+5:302016-04-09T01:35:26+5:30
वास्तववादी विषय वेधकपणे मांडताना त्याची डॉक्युमेंटरी होण्याची भीती असते. मनोरंजनच हरवून जाण्याचा धोका असतो; परंतु महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ढवळून काढत
मराठी चित्रपट -बेनझीर जमादार
वास्तववादी विषय वेधकपणे मांडताना त्याची डॉक्युमेंटरी होण्याची भीती असते. मनोरंजनच हरवून जाण्याचा धोका असतो; परंतु महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ढवळून काढत असलेला वाळूमाफियांचे विश्व उलगडून दाखविताना त्यातील मनोरंजकता न हरवू देण्याची खबरदारी ‘रेती’ या चित्रपटात घेतली आहे. आशयघन आणि वास्तववादी असा अॅक्शन आणि थ्रीलर असणारा ‘रेती’ समाजाचे प्रतिबिंब दाखवून प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारा आहे.
सध्या महाराष्ट्रातील अवैध वाळूचोरी विषय गाजतोय. त्यामागील वास्तव दिग्दर्शक सुहास भोसले यांनी अचूक व योग्य मांडणीत उलगडले आहे. भ्रष्ट सरकारी अधिकारी, माफियाचं साम्राज्य, पोलिसांची कारवाई, राजकीय हस्तक्षेप, सत्तेसाठी नात्यांतच सुरू झालेले शह-काटशह हा सगळा पट मांडताना पर्यावरणाचा प्रश्नही येथे येतो. नगरापासून उपनगरांपर्यंत मोठमोठ्या बांधणाऱ्या इमारती व शहराला चमचम करणारे मॉल्स, अशा सर्व बांधमकामांसाठी लागणारी रेती ही त्या त्या ठिकाणांपर्यंत कशी पोहोचते, यामागे नक्की कशाप्रकारचे राजकारण असते. तसेच वाळूची मोठ्या प्रमाणावर होणारी लूट, ही लूट कशा कशाप्रकारे होते अशी गल्लीतील सामान्य नागरिकापासून ते सरकारपर्यंत फिरणारी ही वास्तववादी कहाणी आरसा दाखविणारा ठरते.
शंकऱ्या (चिन्मय मांडलेकर) या ट्रकड्रायव्हरची ही कहाणी. वाळूव्यवसायातील हा खूप छोटा घटक. वाळूवाहतुकीचे काम तो करतो; मात्र त्याची एक महत्त्वाकांक्षा आहे, स्वप्न आहे आणि त्यासाठी कुठल्याही थराला जायची त्याची तयारी आहे. शंकरला आपला बॉस किसनची (किशोर कदम) जागा घ्यायची आहे. त्याचं सुलीवर (गायत्री सोहम) प्रेम आहे, तिला सोन्याने मढवायची स्वप्नं तो पाहतो आहे; मात्र या सगळ्यांत नात्यांचा सगळा पट उसवत जातो. व्यवसायातील भेसूर चेहरा आणि प्यादे-वजीराचा खेळ सुरू होतो.
रुढार्थाने नायकाची नसलेली भूमिका करताना चिन्मयने कमाल केली आहे. सुरुवातीला भोळसर, निष्पाप वाटणाऱ्या शंकरचे हळूहळू विकृत होत जाणे त्याने ताकदीने दाखविले आहे. किशोर कदम, शशांक शेंडे, सुहास पळशीकर यांच्या अभिनयाबाबत तर काही बोलण्याची गरज नाही. किशोर कदम यांनी वाळूमाफिया रंगविताना कोठेही ओव्हरप्ले केला नाही, तर शशांक शेंडे त्यांच्या देहबोलीतूनच आपले कॅरेक्टर उभे करतात. संजय कापरे यांचा पर्यावरणवादी कार्यकर्ता सच्चा वाटतो. विद्याधर जोशी, दीपक करंजीकर, मोसमी तोंडवळकर, भाग्यश्री राणे या सर्व कलाकारांनी आपल्याला मिळालेल्या भूमिका उत्कृष्टरीत्या निभावल्या आहे.
कथा, पटकथा आणि संवाद अशी तिहेरी भूमिका निभावणाऱ्या देवेन कापडणीस यांची पटकथाच इतकी ताकदीची आहे की, हा विषय थेट मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. संजय पाटील यांच्या गाण्यांना बॉलीवूडचा तगडा गायक शान यांनी संगीत दिले आहे. सुहास भोसले यांनी रिअललाइफ शूटवर भर दिला असला, तरी आणखी तांत्रिक सफाई चित्रपट आणखी उंचीवर घेऊन गेली असती, ते जाणवते.
मराठी चित्रपटसृष्टीला आणखी पुढे नेण्याचा निर्माते प्रमोद गोरे आणि सगळ्या टीमचा हा प्रयत्न एक अत्यंत संवेदनशील विषय ऐरणीवर आणतो. त्यामध्ये प्रेक्षक गुंतून गेल्याशिवाय राहत नाहीत.