"विषयच खऱ्याखुऱ्या ANGRY YOUNG MAN चा", 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर थेटच बोलले संदीप खरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:37 PM2024-04-01T12:37:07+5:302024-04-01T12:37:26+5:30

Swatantryaveer Savarkar Movie : "सावरकरांवर वेब सीरिज यायला हवी", 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर संदीप खरे यांची प्रतिक्रिया

sandeep khare gets impressed after watching randeep hooda swatantryaveer savarkar movie | "विषयच खऱ्याखुऱ्या ANGRY YOUNG MAN चा", 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर थेटच बोलले संदीप खरे

"विषयच खऱ्याखुऱ्या ANGRY YOUNG MAN चा", 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर थेटच बोलले संदीप खरे

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. वीर सावरकर यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर या सिनेमातून उलगडण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता रणदीप हु्ड्डा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेत आहे. वीर सावरकरांची भूमिका त्याने अत्यंत चोखरित्या साकारली आहे. त्याबरोबरच त्याने सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे.  अभिनय आणि दिग्दर्शनासाठी रणदीप हुड्डाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमाबाबत अनेक मराठी कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. आता प्रसिद्ध गायक संदीप खरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमासाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर संदीप खरे भारावून गेले आहेत. या सिनेमाबाबत त्यांनी सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दल त्यांनी थेट मत मांडलं आहे. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर संदीप खरेंची पोस्ट

वीर सावरकर चित्रपट पाहिला ! विषयच खऱ्याखुऱ्या ANGRY YOUNG MAN चा !! 

 

त्यांच्यावरील उलटसुलट चर्चा, वादविवादही ऐकत आलो आहे आणि ऐकतो आहे! या निमित्ताने पुन्हा एकदा वाटलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणं तर सोडून द्या, पण त्यांचं कौतुक करण्याची तरी आपली योग्यता, क्षमता आहे का? हे एकदा तपासून बघायला हवं! आणि सावरकरच नव्हे तर छत्रपती शिवराय, महात्मा गांधी, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे आणि अशा अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांविषयी हेच वाटतं मला !!

राम गणेश गडकरी यांना जेव्हा एकदा टिळक आणि आगरकर यांच्या वादाविषयी विचारलं होतं. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर फार विलक्षण आहे! ते त्या माणसाला म्हणाले होते, “ मित्रा, या आकाशातील नक्षत्रांच्या शर्यती आहेत! यात आपल्यासारख्यांनी बोलायचं नसतं !!" असो.

सांगायचा मुद्दा की हा चित्रपट एका फार मोठ्या, विलक्षण, प्रज्ञावान, प्रतिभासंपन्न, चिवट, द्रष्ट्या, जाज्वल्य देशाभिमानी अशा नेत्याचा, वक्त्याचा, कवीचा, लेखकाचा, नाटककाराचा, भाषाकाराचा, तर्कसंगत समाजसुधारकाचा, विज्ञाननिष्ठ बुद्धिवंताचा एक ‘स्मरणपट ‘ आहे!

प्रेक्षकांमध्ये उपस्थित तरुणांची संख्या पाहून मला विलक्षण समाधान वाटले ! "तरुणांना असे हिमालय दाखवायला हवेत, अन्यथा रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर्सना ते पर्वत समजू लागतील" - या आशयाचे व.पु.काळे यांचे विधानही आठवले!

सावरकरांसारखे महाकाय, बहुआयामी व्यक्तिमत्व चित्रपटातूनच काय पण काव्य, चरित्र, कादंबरी अशा साहित्य प्रकारातूनही साकारणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच अवघड! सावरकर समजायला, आकळायला, साकारायला खरं तर सावरकरांचीच प्रतिभा हवी! काही तासांच्या चित्रपटात किंवा काहीशे पानांच्या पुस्तकात मावतील असे सावरकर नव्हेतच !
पण तरीही एका विलक्षण ध्यासाने चित्रपटाच्या सर्वगामी माध्यमातून हे महाकाय व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो आहे ही गोष्ट नक्कीच मोलाची! त्यासाठी रणदीप हुड्डा आणि सर्व चमूचे मनःपूर्वक आभार! आपले बाबूजी अर्थात गायक, संगीतकार श्री. सुधीर फडके यांनीही खडतर परिश्रमातून साकारलेल्या सावरकरांवरील चित्रपटाचे स्मरणही या ठिकाणी आवश्यकच!

फार फार वाटले की या ज्वालामुखी व्यक्तिमत्त्वाचा बालपणापासून अंतिम प्रायोपवेषनापर्यंतचा प्रवास साकारणारी एखादी आंतरराष्ट्रीय दर्जाची महामालिका (web series ) यायला हवी!! येईल! येईलच!! (हा 'च' खास सावरकरी वक्तृत्वातला !!) माझ्या मर्यादित कलागुणांची एखादी ओंजळ त्यात मी ही वाहेन !!

सावरकरांनी काळ्या पाण्याची, दोन जन्मठेपेंची सजा दिसत असूनही, कोलू ओढत, कोरडे खात समर्थ, अखंड राष्ट्राचे स्वप्न धगधगत ठेवले; आपण त्या स्वप्नांसोबतच त्यांच्यावरील अशा महामालिकेची महत्वाकांक्षा तरी ठेवायलाच हवी !!

दरम्यान, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातून रणदीप हुड्डाने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. या सिनेमात अभिनेत्री अंकिता लोखंडेने वीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

Web Title: sandeep khare gets impressed after watching randeep hooda swatantryaveer savarkar movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.