"वचनाची राखतो आग, मर्दमावळा शिवरायांचा वाघ"; 'संघर्षयोद्धा'मधील धडाकेबाज गाणं बघाच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:49 AM2024-04-04T11:49:44+5:302024-04-04T11:50:56+5:30
'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमातील मर्दमावळा शिवरायांचा वाघ हे धडाकेबाज भेटीला आलंय
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा टीजर तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या "उधळीन मी..." या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातलं "मर्दमावळा...: हे धडाकेबाज गाणं लाँच करण्यात आलं आहे. दिव्य कुमार यांच्या दमदार आवाजात हे गीत स्वरबद्ध करण्यात आल आहे.
मर्दमावळा या गाण्याला वीरश्री चेतवणारे शब्द, ताल धरायला लावणारं संगीत, भारदास्त आवाज लाभलाय. दिव्यकुमार यांनी हे गाणं गायलं असून, मंगेश कांगणे यांच्या शब्दांना चिनार महेश यांचं दमदार संगीत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजानं केलेलं अफाट प्रेम, आरक्षणासाठी राज्यभर फिरताना त्यांना मिळालेला तुफान प्रतिसाद, त्यांच्या सभांना झालेली गर्दी या गाण्यात दाखविण्यात आली आहे. उत्तम गाण्याचं नेत्रदीपक चित्रीकरणही करण्यात आले आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वासारखंच "मर्दमावळा" हे गाणंही रांगडेपण दर्शवणारं आहे.
शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलले असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.
याशिवाय या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. येत्या २६ एप्रिल रोजी "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.