'दिव्य दृष्टी'साठी संगीता घोष शिकली 'ही' गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 08:40 PM2019-03-04T20:40:00+5:302019-03-04T20:40:00+5:30
आपली भूमिका अधिक वास्तववादी करण्यासाठी अनेक कलाकार खूप मेहनत घेत असतात आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संगीता घोष ही अशा काही कलाकारांपैकी एक आहे.
आपली भूमिका अधिक वास्तववादी करण्यासाठी अनेक कलाकार खूप मेहनत घेत असतात आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संगीता घोष ही अशा काही कलाकारांपैकी एक आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेत ती पिशाचिनीची भूमिका साकारीत असून ही भूमिका जास्तीत जास्त वास्तववादी वाटावी, यासाठी तिने कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही.
या मालिकेत पिशाचिनीला हवेत उडताना तसेच एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उड्या मारताना दाखविले आहे. तिच्याकडील काही अमानवी शक्तींमुळे प्रेक्षक थक्क झाले आहेत. यातील अनेक स्टंट प्रसंग संगीताने स्वत:च साकार केले आहेत. आपली भूमिका अचूक उभी करण्यासाठी लागतील ते कष्ट करण्याची संगीताची तयारी असून त्यासाठी तिने रोप क्लाइंबिंगचेही प्रशिक्षण घेतले आहे. ते सोपे नसले, तरी या भूमिकेच्या परिपूर्णतेसाठी तिने ही जोखीम उचलण्याचा
निर्णय घेतला आहे.
‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते. तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो. संगीता घोषला पिशाचिनीची भूमिका साकार करताना पाहणे हा प्रेक्षकांसाठी एक थक्क करणारा अनुभव असतो.