Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'
By संजय घावरे | Updated: April 18, 2025 16:53 IST2025-04-18T16:49:14+5:302025-04-18T16:53:14+5:30
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review: जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'

Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'
'मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली। आद्यत्रय जननी देवाचिये॥' असे संत निळोबारायांनी संत मुक्ताबाईंचे अत्यंत कमी शब्दांत मार्मिक वर्णन केले आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने हेच चित्र रुपेरी पडद्यावर दाखवले आहे. विश्वाला प्रबोधन करणाऱ्या संतांच्या जीवनावर प्रकाश टाकत सातशे वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेल्या विचारांचा ठेवा दृक-श्राव्य रूपात सादर केला आहे.
कथानक : आळंदीकरांनी वाळीत टाकलेल्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या घरी मुक्ताईच्या रूपात आदिमाया जन्म घेते. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान या भावंडांसोबत मुक्ताईला वडीलांकडून ज्ञानसाधनेचे धडे मिळतात. मुलांच्या मुंजेसाठी विठ्ठलपंत ग्रामसभेत जातात, पण तिथे त्यांना सपत्नीक देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली जाते. दोघांनीही इंद्रायणीमध्ये देहत्याग केल्याने अनाथ झालेल्या चार भावंडांना गावात कोणी भिक्षा देत नाही. भिक्षेत शेण मिसळले जाते. त्यांचे हाल केले जातात. तरीही विश्वात्मक देवाकडे मागणे मागताना सर्वप्रथम 'जे खळांची व्यंकटी सांडो...' असे म्हणत खळांचा विचार करणारे ज्ञानेश्वरमाऊली आणि चित्कला मुक्ताबाईंच्या विचारांची ही गोष्ट आहे.
लेखन-दिग्दर्शन : 'संतसंगतीचे काय सांगूं सुख । आपण पारिखें नाहीं तेथें ॥ साधू थोर जाणा, साधू थोर जाणा । साधू थोर जाणा कलियुगीं॥' हा संत नामदेव महाराजांनी रचलेला अभंग खऱ्या अर्थाने कलियुगात काय करायला पाहिजे हे सांगणारा आहे. दिग्पालने चित्रपटातही तेच दाखवले आहे. अखेरपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या पटकथेला संवाद अर्थपूर्ण आणि समुधूर संगीताची आहे. अभंगांचा सुरेख वापर केला आहे. विठ्ठलपंत-रुक्मिणीचे निरोपाचे क्षण, ताटीचा प्रसंग, विसोबा खेचर शरण येणे, माऊलींच्या संजीवन समाधीचे दृश्ये डोळ्यांच्या ओलावणारी आहेत. पैठणच्या धर्मसभेतील सनातन हिंदू धर्माची व्याख्या महत्त्वाची आहे. मुक्ताईची गोष्ट सांगणारी यशोदा शेवटी 'आता रडू नका' असे म्हणत जणू आज माऊलींचे विचार अमलात आणण्याची वेळ आल्याचेच सांगते. व्हीएफक्स आणखी प्रभावी हवे होते.
अभिनय : नेहा नाईकने शीर्षक भूमिकेत जीव ओतला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत शोभणाऱ्या तेजस बर्वेने अत्यंत सुरेख अभिनय केला आहे. अक्षय केळकरने गुरूदादा निवृत्तीनाथांच्या भूमिकेत शांतपणे रंग भरले आहेत. सूरज पारसनीसने सोपानाची भूमिका चांगली केली आहे. समीर धर्माधिकारी आणि मृणाल कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा सजीव केल्या आहेत. अजय पुरकर यांनी साकारलेले योगी चांगदेव लक्ष वेधून घेतात. मनोज जोशी यांनी पैठणचे ब्रह्मेश्र्वर शास्त्री छान रंगवले आहेत. योगेश सोमण यांनी मनात चीड निर्माण करणारी विसोबा खेचर यांची खलनायकी भूमिका सहजपणे साकारली आहे. स्मिता शेवाळेला सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम करण्याची संधी मिळाली.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, संगीत, दिग्दर्शन, अभिनय, कला दिग्दर्शन, संकलन
नकारात्मक बाजू : व्हीएफएक्स, मसालापटांच्या चाहत्यांसाठी काही नाही
थोडक्यात काय तर आज आपण माऊलींना डोक्यावर घेतो, त्यांचा उदो उदो करतो, त्यांच्या नावाने पोट भरतो, त्यांचाच त्या काळी किती छळ झाला आणि तरीही त्यांनी विश्वप्रार्थना करताना संपूर्ण जगाचा विचार का केला हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहावा.