Gaslight Movire Review :पास की फेल ? कसा आहे सारा अली खानचा ‘गॅसलाइट’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 01:44 PM2023-03-31T13:44:40+5:302023-03-31T13:56:07+5:30

Gaslight Movie Review : जाणून घ्या कसा आहे, सारा अली खान, विक्रांत मेस्सी, चित्रांगदा सिंग यांचा 'गॅसलाइट’ सिनेमा.

Sara ali khan gaslight movie review | Gaslight Movire Review :पास की फेल ? कसा आहे सारा अली खानचा ‘गॅसलाइट’

Gaslight Movire Review :पास की फेल ? कसा आहे सारा अली खानचा ‘गॅसलाइट’

googlenewsNext

कलाकार : सारा अली खान, विक्रांत मेस्सी, चित्रांगदा सिंग व इतर.
निर्माता : रमेश तौरानी, अक्षय पुरी
दिग्दर्शक : पवन कृपलानी
लेखक : पवन कृपलानी
शैली : हॉरर, थ्रिलर
स्टार : तीन स्टार 
चित्रपट परीक्षण : अबोली शेलदरकर

‘रागिणी एमएमएस’, ‘भूत पोलिस’, ‘फोबिआ’ आणि ‘डर ॲट द मॉल’ यासारख्या सस्पेन्स, थ्रिलरवर आधारित चित्रपटांच्या कथा लिहिणारे लेखक व दिग्दर्शक पवन कृपलानी यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘गॅसलाइट’ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. पतौडी खानदानाची लेक अर्थात सारा अली खान, चित्रांगदा सिंग, विक्रांत मेस्सी ही नव्या दमाची फळी या चित्रपटातून शानदार अभिनय साकारताना दिसत आहे. सस्पेन्स, थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री असलेला ‘गॅसलाइट’ चित्रपट प्रचंड उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारा आहे. चला तर मग बघूयात, नेमका कसा आहे हा चित्रपट...

कथानक : ‘गॅसलाइट’ चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलरवर आधारित आहे. या चित्रपटात मीशा (सारा अली खान) ही एक अपंग मुलगी असून ती तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून घरी परतते; परंतु तिचे वडील घरी नसतातच. ती सर्वांना विचारते; पण तिला कुणीच नीट उत्तर देत नाही. मग ती तिच्या वडिलांचा शोध सुरू करते. शोध घेत असतानाच तिचा संशय तिची सावत्र आई रेणुका (चित्रांगदा सिंग) हिच्यावर येऊन थांबतो. दुसरीकडे तिच्या वडिलांचा बॉडीगार्ड कपिल (विक्रांत मेस्सी) या भूमिकेत दिसतो आहे. सारा या संपूर्ण मर्डर मिस्ट्रीला सोडवते. या प्रवासात तिला कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो, कोणते ट्विस्ट आणि टर्नस येतात, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटच बघावा लागेल.

अभिनय :चित्रपटासाठी कलाकारांची निवड अगदी योग्य केली आहे. सारा अली खान ही तिच्या आत्तापर्यंतच्या सर्वांत उत्कृष्ट भूमिकांपैकी एक भूमिका साकारताना दिसत आहे. तिचा दमदार अभिनय हा या चित्रपटाचा यूएसपी मानला पाहिजे. इतरवेळी चुलबुली आणि बिनधास्त अंदाजात दिसणारी सारा यात अत्यंत गंभीर आणि लक्षवेधी ठरत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही तर उत्कृष्ट अभिनेत्री आहेच पण, ती सावत्र आईच्या भूमिकेसाठी तिची योग्य निवड करण्यात आली आहे. तसेच वेबसीरिजमधून दर्जेदार भूमिका वठवणारा अभिनेता विक्रांत मेस्सी त्याच्या अभिनयाच्या १०० टक्के देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा चित्रपट या तीन मुख्य कलाकारांभोवतीच फिरताना दिसतो.

लेखन व दिग्दर्शन : लेखन,दिग्दर्शन आणि पटकथा लेखक या चित्रपटासाठीच्या महत्त्वाच्या बाजू अत्यंत सक्षमपणे सांभाळणारा दिग्दर्शक पवन कृपलानी यांनी चित्रपटाचे उत्कृष्ट लेखन केले आहे. चित्रपटाचे खरे यश हे त्यातील कलाकार आणि कथा यांचे असते. जर कलाकारांची निवड योग्य करण्यात आली तरच चित्रपटाला चार चाँद लावतात. सारा अली खान, चित्रांगदा सिंग आणि विक्रांत मेस्सी हे दमदार त्रिकूट जेव्हा एकत्र येते तेव्हाच हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणार, असे लक्षात येते. या चित्रपटात एकही गाणे नाही, केवळ बॅकग्राऊंड म्युजिकच्या आधारे कथानक पुढे सरकते. त्याशिवाय चित्रपटात शिव्या, मारहाण असे काहीही दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे हा चित्रपट कुटुंबाने एकत्र बसून बघावा असाच आहे.

सकारात्मक बाजू : सारा, चित्रांगदा आणि विक्रांत यांचा उत्कृष्ट अभिनय, कथानक
नकारात्मक बाजू : विशेष नाही
थाेडक्यात : तुम्ही हॉरर, सस्पेन्स आणि थ्रिलरपटाचे चाहते असाल तर नक्की हा चित्रपट बघायला हवा.
 

Web Title: Sara ali khan gaslight movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.