Ae Watan Mere Watan Teaser : तरुण स्वातंत्र्यसेनानीच्या भूमिकेत दिसणार सारा अली खान, सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:52 PM2023-01-23T13:52:36+5:302023-01-23T13:56:11+5:30
पांढरी साडी, कपाळावर कुंकू, वेणी अशा लुकमध्ये साराची महत्वपूर्ण भूमिका
Ae Watan Mere Watan Teaser : बॉलिवुड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) चाहत्यांसाठी सरप्राईज घेऊन आली आहे. 'ए वतन मेरे वतन' या सिनेमात सारा पहिल्यांदाच स्वातंत्र्यसेनानीच्या (Freedom Fighter) भुमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला असून यात साराचा लुक बघुन चाहते प्रभावित झाले आहेत. साराने सोशल मीडियावर सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे.
1942 च्या भारत छोडो आंदोलनावर सिनेमाचे कथानक आधारित आहे. 'ए वतन मेरे वतन' असं सिनेमाचं टायटल असून याचा छोटा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. टीझर सुरुवात होते ती एका अंधाऱ्या खोलीत सारा घाबरलेल्या अवस्थेत येते. गडबडीने ती दरवाजा बंद करते, कडी लावते. पडदे झाकते. खोलीत असलेले रेडिओ उपकरण गडबडीत सुरु करते. यानंतर ती माईकवर बोलते, 'इंग्रजांना वाटत आहे की त्यांनी भारत छोडो आंदोलन हाणून पाडलं आहे. मात्र स्वतंत्र आवाज बंदिस्त करुन ठेवता येत नाही. हा हिंदुस्तानचा आवाज आहे.' तेवढ्यात जोरात दरवाजा वाजतो. तिच्या चेहऱ्यावर भीती असते. पांढरी साडी, कपाळावर कुंकू, वेणी असा तिचा लुक आहे.
यातून स्पष्ट होतं की 'ए वतन मेरे वतन' १९४२ च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. यात साराची तरुण फ्रीडम फायटरची भूमिका बघायला मिळत आहे. तिची हिंमत, देशभक्ती आणि स्वातंत्र्यासाठी लढण्याची तयारी यातून दिसून येते.
'ए वतन मेरे वतन' अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अद्याप सिनेमाची रिलीज डेट समजलेली नाही. दरब फारुकी यांनी सिनेमाचे कथानक लिहिले आहे. तर कन्नर अय्यर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.