सरबजीत सिंह - भावस्पर्शी आणि कसदार अभिनय

By Admin | Published: May 22, 2016 01:14 AM2016-05-22T01:14:53+5:302016-05-22T01:14:53+5:30

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील तुरुंगात डांबण्यात आलेल्या पंजाबच्या सरबजीत सिंहची कैद्यांकडून हत्या करण्यात आली आणि तमाम भारतीयांची मने हादरली.

Sarabjit Singh - Aspiring and Tactical Actress | सरबजीत सिंह - भावस्पर्शी आणि कसदार अभिनय

सरबजीत सिंह - भावस्पर्शी आणि कसदार अभिनय

googlenewsNext

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील तुरुंगात डांबण्यात आलेल्या पंजाबच्या सरबजीत सिंहची कैद्यांकडून हत्या करण्यात आली आणि तमाम भारतीयांची मने हादरली. भावाच्या सुटकेसाठी सरबजीतची बहीण दलबीर कौरने देशात आणि सीमेपार जाऊन अथक प्रयत्न केले होते. भारत-पाकिस्तान संबंधांदरम्यान हिंदोळे घेणाऱ्या जिवांची घालमेल चित्रित करणारा ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजीत’ हृदयाला हात घालतो.
पाकिस्तानच्या सीमेलगत पंजाबच्या एका गावातील सरबजीत सिंह (रणदीप हुड्डा) दारूच्या नशेत सीमा ओलांडतो. पाकिस्तानचे सैैनिक त्याला हेरगिरीच्या आरोपावरून पकडतात. इकडे त्याचे कुटुंबीय रात्रंदिवस त्याचा शोध घेतात. त्याची मोठी बहीण दलबीर कौर (ऐश्वर्या राय) आणि पत्नी (ऋचा चढ्ढा) त्याला शोधण्यासाठी जिवाचा आटापिटा करतात. पाकिस्तानच्या कोर्टात सरबजीतला रणजीत सिंह म्हणून हजर केले जाते. लाहोरच्या बॉम्बस्फोटाच्या आरोपावरून त्याला फाशीची शिक्षा ठोठावली जाते. त्याची बहीण दलबीर कौर भावाच्या सुटकेसाठी सरकार दरबारी दाद मागते. पंतप्रधानांनाही भेटते. परंतु, कोणाकडूनच तिला प्रतिसाद मिळत नाही. पाकिस्तानच्या तुरुंगात सरबजीतचा अतोनात छळ केला जातो. लाहोरचे एक वकील ओवेसी शेख या खटल्यात मदतीसाठी पुढे येतात. पाकिस्तान सरकारच्या वतीने सरबजीतच्या फाशीची तारीख टाळली जाते. त्यामुळे सरबजीतच्या सुटकेची आशा वाढते. परंतु, ही आशा फोल ठरते. एके दिवशी तुरुंगातील कैदी सरबजीतला बेदम मारहाण करतात. यात त्याचा रुग्णालयात मृत्यू होतो.
वैशिष्ट्ये : चित्रपटातील प्रमुख कलाकारांचा दमदार अभिनय. विशेषत: दलबीर कौरची भूमिका ऐश्वर्या रायने तन्मयतेने साकारली आहे. ऐश्वर्या रायच्या आजवरच्या कारकिर्दीतील ही भूमिका सर्वात सरस आणि संस्मरणीय ठरली आहे. रणदीपने साकारलेली सरबजीतची भूमिकाही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट ठरली आहे. तुरुंगात खितपत पडलेल्या सरबजीतचे दु:ख पडद्यावर साकारताना त्याने खूप मेहनत घेतल्याचे दिसते. या दोघांच्या तुलनेत ऋचा चढ्ढा कमी पडली. दर्शनकुमारने पाकिस्तानी वकिलाच्या भूमिकेत छाप पाडली. दिग्दर्शक म्हणून ओमंग कुमार यांनी सर्व कलाकारांकडून चांगले काम करून घेतले आहे.
उणिवा :
संवेदना हा या चित्रपटाचा गाभा आहे. भारत-पाकिस्तान संबंध, अजाणतेपणी सीमा पार करणारे लोक, तुरुंगात डांबण्यात आलेल्या निर्दोष लोकांचे दु:ख, स्वकीयांच्या परतीची वाट पाहणाऱ्या कुटुंबांची घालमेल आणि भावाच्या सुटकेसाठी बहिणीचा अथक संघर्ष, असे हे भावोत्कट कथानक आहे. भावनावेग संतुलित राखण्यात आणि चित्रपटाची गती कायम राखण्यात मात्र ओमंग कुमार कमी पडले. फिल्मी मसाला वापरल्याने भट्टी जरा बिघडली. गाण्यांच्या अतिरेकामुळे गती खंडित होते. काही ठिकाणी कल्पकतेचा वापर करण्यात आला आहे. शेवट विनाकारण खूप भावूक करण्यात आला आहे. संपादनही दुबळे झाले आहे.
का पाहावा?
सर्व कलाकारांच्या उत्कृष्ट अभियनासाठी.का पाहूू नये?
दुबळी पटकथा, धिमी गती आणि भाव-भावनांतील असमतोल. एकूणच भावोत्कटपणा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना पसंतीस पडेल.

Web Title: Sarabjit Singh - Aspiring and Tactical Actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.