Satish Kaushik: तब्बल ३ दशके बॉलिवूडमध्ये काम केलेल्या सतीश कौशिक यांनी एकूण किती संपत्ती कमावली?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 08:58 AM2023-03-09T08:58:56+5:302023-03-09T10:02:55+5:30
सतीश कौशिक यांनी जवळजवळ तीन दशके बॉलिवूडमध्ये घालविली. त्यांनी पूर्ण जोमाने काम केले.
मुंबई - अभिनेता आणि दिग्दर्शक राहिलेल्या सतीश कौशिक यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप काळ घालवला आहे. मौसममध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी अनेक चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या विनोदी शैलीने लाखो-करोडो चाहत्यांची मने जिंकली. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या सतीश कौशिकने आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणले. सतीश आज या जगात नाहीत याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्यामागे पत्नी शशि कौशिक आणि मुलगी वंशिका असं कुटुंब आहे.
सतीश कौशिक यांनी जवळजवळ तीन दशके बॉलिवूडमध्ये घालविली. त्यांनी पूर्ण जोमाने काम केले. कधी त्यांनी अभिनय केला तर कधी सिनेमाचं दिग्दर्शन केले. याचमुळे आपल्या कलाकौशल्याच्या बळावर कौशिक यांनी कोट्यवधीची संपत्ती जमवली. २०२३ मध्ये सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये आहे. बॉलिवूडमध्ये सतीश कौशिक यांनी चांगले मित्रही मिळवले. अनुपम खेर आणि अनिल कपूर हे त्यांचे जिगरी यार होते. तिघेही एकमेकांवर जीव लावायचे. प्रत्येक कठीण काळात एकमेकांना आधार देण्यासाठी एकत्र यायचे. ते बर्याच चित्रपटांमध्ये एकत्रही दिसले.
फिटनेसकडे द्यायचे लक्ष
वयाच्या या टप्प्यावरही सतीश कौशिक फिटनेसकडे पूर्ण लक्ष देत असे. ते व्यायामशाळेत वर्कआउट करत असे. सोशल मीडियावर खूप सक्रिय होते आणि व्यायाम करताना त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचे.
आयुष्यात आलेला मोठा बॅड पॅच
अभिनेते सतीश कौशिक यांचे १९८५ मध्ये शशि कौशिक यांच्याशी लग्न झाले. या दोघांना १९९४ मध्ये मुलगा झाला होता. परंतु अवघ्या २ वर्षात या मुलाचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूनंतर सतीश कौशिक पूर्णपणे खचले होते. या घटनेने सतीश कौशिक मानसिकदृष्ट्या हादरले होते. ज्यातून त्यांना बाहेर पडायला खूप काळ लागला. त्यानंतर कौशिक यांच्या घरी १६ वर्षांनी लहान मुलाचा आवाज ऐकायला मिळाला. तब्बल १६ वर्षांनी २०१२ मध्ये सरोगेसीच्या माध्यमातून कौशिक यांच्या घरी मुलीने जन्म घेतला. मुलीच्या जन्मानंतर घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले.