मृत्यूपूर्वी सतीश कौशिक यांचे अखेरचे शब्द; "मला मरायचं नाही, मला वाचव..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 09:46 AM2023-03-12T09:46:10+5:302023-03-12T09:47:09+5:30
रात्री १२.१५ वाजता ते जोरजोरात माझे नाव घेत ओरडू लागले. मी धावत त्यांच्या खोलीत गेलो असं संतोष रायने सांगितले.
नवी दिल्ली - अभिनेते, कॉमेडियन आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या अचानक एक्झिटने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. होळीच्या दिवशी सेलिब्रिशन करणारे सतीश कौशिक आता या जगात नाहीत याची कल्पनाही कुणी केली नसावी. फिल्म इंडस्ट्रीपासून कुटुंबही सतीश कौशिक यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरले नाही. सतीश कौशिक यांच्या अखेरच्या काळात त्यांचा मॅनेजर संतोष रायसोबत होता. आता संतोष राय यांनी त्यादिवशी नेमकं काय घडले याचा खुलासा केला आहे.
अखेरच्या रात्री काय घडलं याबाबत संतोष राय यांनी सांगितले की, मी जवळपास ३४ वर्ष सतीश कौशिक यांच्यासोबत काम करतोय. बुधवारी रात्री जेवल्यानंतर कौशिक यांना काहीही लक्षणे जाणवली नाहीत. रात्री ८.३० वाजता जेवण उरकलं. ९ मार्चला सकाळी ८.५० वाजता फ्लाईटने मुंबईतला परतायचे होते. संतोष, लवकर झोप, उद्या सकाळी फ्लाईट पकडायची आहे असं त्यांनी म्हटल्यावर मी ठीक आहे सर असं म्हणत बाजूच्या खोलीत झोपायला गेलो असं त्यांनी म्हटलं.
त्यानंतर रात्री ११ वाजता मला फोन आला. संतोष, इथे ये, मला वायफाय पासवर्ड ठीक करायचा आहे. कागज २ सिनेमाच्या एडिटच्या दृष्टीने तो सिनेमा पाहायचा होता. कागज २ हा सिनेमा सतीश कौशिक यांनीच दिग्दर्शित केला आहे. रात्री ११.३० वाजता सिनेमा पाहायला सुरुवात केला त्यानंतर मी पुन्हा माझ्या खोलीत परतलो असं संतोष रायनं सांगितले.
रात्री १२.१५ वाजता ते जोरजोरात माझे नाव घेत ओरडू लागले. मी धावत त्यांच्या खोलीत गेलो आणि विचारलं काय झाले सर, का ओरडत आहात? तेव्हा त्यांनी मला श्वास घेण्यास त्रास होतोय. प्लीज मला डॉक्टरांकडे घेऊन चल, आम्ही तातडीने ते आणि मी कारच्या दिशेने गेलो. तिथे ड्रायव्हर आणि बॉडीगार्डही होते. जसे आम्ही हॉस्पिटलला निघालो तसे त्यांच्या छातीतील वेदना वाढल्या. लवकर चला, कौशिक यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत संतोष, मला मरायचं नाही, वाचव असं म्हटलं. मला वंशिकासाठी जगायचंय. मी जगेन असं वाटत नाही. शशि आणि वंशिकाची काळजी घे असं त्यांनी सांगितले. ८ मिनिटांत आम्ही फॉर्टिस हॉस्पिटलला पोहचलो. त्याठिकाणी ते बेशुद्ध झाले होते असं संतोष राय यांनी म्हटलं.
महिलेचा दावा, कौशिक यांची झाली हत्या
सतीश कौशिक यांच्या मृत्यूने सगळेच हैराण आहेत. त्यात एका महिलेने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यात सतीश कौशिक यांचा खून झाल्याचा दावा केला आहे. ही महिला दुसरी कोणी नसून सतीश कौशिक यांची मैत्रीण आणि व्यापारी विकास मालू यांची पत्नी आहे. १५ कोटींच्या वादातून तिच्या पतीने सतीश कौशिकची हत्या केल्याचा महिलेचा दावा आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी तिच्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते. मात्र पतीकडे देण्यासाठी पैसे नसल्याने या वादातून त्याने ही हत्या केली असं तिने म्हटलं आहे.