या कारणामुळे भडकला सौरभ शुक्ला, चक्क पोलिसांकडे नोंदवली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:36 PM2020-04-23T12:36:00+5:302020-04-23T12:40:01+5:30
सौरभ शुक्लाने सोशल मीडियाद्वारे पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे काहीही महत्त्वाचे कारण असेल तरच लोकांनी घराच्या बाहेर पडावे असे सगळ्यांना सरकारने सांगितले आहे. अधिकाधिक लोक घरात असल्याने सध्या सोशल मीडियावर लोक चांगलेच सक्रिय आहेत.
कोरोना व्हायरसवर तर अनेक मीम्स बनवले जात असून यातील एका मीममुळे सत्या फेम अभिनेता सौरभ शुक्ला चांगलाच भडकला आहे. सौरभ शुक्लावर एक मीम बनवण्यात आले असून या मीममुळे त्याने चक्क पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या मीमध्ये एका बोर्डाजवळ सौरभ शुक्ला उभा असून या बोर्डवर लिहिण्यात आले आहे की, लॉककडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याऐवजी कोरोना झालेल्या लोकांसोबत या लोकांना ठेवावे. कारण कोरोना हा व्हायरस त्यांचे काहीही बिघडवू शकत नाही असे त्यांना वाटते. सौरभवर बनवण्यात आलेले हे मीम त्याने पाहिल्यानंतर ट्विटवरद्वारे त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने ते मीम शेअर करत लिहिले आहे की, माझ्या फोटोचा चुकीचा वापर केला जात असून हा फोटो पाहून मी हैराण झालो होतो. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत अशाप्रकारचे मीम शेअर करणे अतिशय चुकीचे आहे असे म्हणत त्याने मुंबई पोलिसांना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या ट्वीट मध्ये टॅग केले आहे.
Such irresponsible memes are most harmful in such times. This fake image has been circulated on social media. Totally unacceptable that an image and content distortion has been made. I am deeply shocked and disturbed. @MumbaiPolice@CMOMaharashtrapic.twitter.com/mOJ2nwApP1
— saurabh shukla (@saurabhshukla_s) April 19, 2020
सौरभच्या या तक्रारीची मुंबई पोलिसांनी त्वरित दखल घेतली असून त्यांनी सौरभला रिप्लाय केला आहे की, तुमची तक्रार आम्ही सायबर पोलिसांकडे दिली असून ते यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करतील.
We have forwarded your complaint to the cyber cell and social media lab for further necessary action.
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 19, 2020