‘सावित्री’च्या लेकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2016 02:32 AM2016-08-03T02:32:01+5:302016-08-03T02:32:01+5:30
वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा जोशी आता सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारतेय.
वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा जोशी आता सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारतेय. या भूमिकेनंतर नेहाला लक्ष्मीबाई टिळक ही भूमिका रुपेरी पडद्यावर साकारण्याची इच्छा आहे. याच निमित्ताने नेहा जोशी हिच्याशी साधलेला संवाद.
सावित्रीबाई फुले ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी तुला कशी मिळाली?
- ‘आवाज’ या सीरिजमधील जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मालिकेत सावित्रीबाई फुले साकारायला मिळतंय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. चिन्मय मांडलेकरच्या लिखाणामुळे ही भूमिका करणं अधिक सोपं गेलं. त्याचं लिखाण हे खूप ओघवतं, अतिशय अभ्यासपूर्ण असून प्रत्येकाला आपलंसं वाटतं. या भूमिकेसाठी मला चिन्मय मांडलेकरचा फोन आला आणि लगेचच मागचापुढचा विचार न करता होकार कळवला. प्रसाद ओकबरोबर हा माझा सहावा प्रोजेक्ट आहे. त्याच्याबरोबर काम करताना नेहमी शिकायला मिळतं. सावित्रीबाई फुले करण्याआधी मी कधी प्रसादची बायको बनली, कधी पुतणी बनली तर कधी बहीण बनली. अशी विविध नाती त्याच्यासह पडद्यावर साकारण्याची संधी मला मिळालीय.
सावित्रीबाई फुले साकारताना तुझ्या जीवनात काय बदल घडला?
- जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आतापर्यंत आपण पुस्तकात वाचलंय. मात्र या भूमिकेतून सावित्रीबाई नेमक्या कशा होत्या? त्यांचा स्वभाव कसा होता? त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आज कोणत्याही मुद्द्याला वाचा फोडण्यासाठी आपल्यात एवढी ताकद नाही. आज जेव्हा जेव्हा मी खचते याच सगळ्या गोष्टी माझ्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतात.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयीचा अभ्यास करताना किंवा भूमिका साकारताना एखादा किस्सा जो तुला भावलाय?
- या मालिकेतील एक किस्सा तर माझ्या मनाला स्पर्श करून गेला. सावित्रीबाईंना मुलं नसल्याने त्यांना बारसं किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलं जात नसे. एकदा त्यांच्या गावात एक समारंभ असतो. तेव्हा जोतिबा फुले विचारतात तू का नाही गेली, तेव्हा त्या म्हणतात, कारण बायकांना नाक मुरडण्याची, नको नको त्या गोष्टी बोलण्याची संधी मिळेल. त्यावर नंतर लगेचच जोतिबा फुले उत्तर देतात आता वेळ मिळालाय ना तर मग तिथे जाण्यापेक्षा दोन पुस्तकं जास्त वाचा. जोतिबा फुले यांचा हा सल्ला हा वरवर छोटीशी गोष्ट असली तरी यातून खूप मोठ्या गोष्टी शिकायला मिळतात.
सावित्रीबाई साकारल्यानंतर रुपेरी पडद्यावर कुणाच्या जीवनावरील बायोपिक करायला आवडेल? तसंच तुझ्या सध्याच्या आणि आगामी प्रोजेक्टविषयीसुद्धा जाणून घ्यायला आवडेल?
छोट्या पडद्यावर सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारल्यानंतर मोठ्या पडद्यावर मला लक्ष्मीबाई टिळक साकारायला आवडेल. सध्या मी त्यांचं चरित्र वाचतेय. आपण कल्पनाही करू शकत नाही असे थोर विचार त्यांचे होते. याशिवाय सध्या हिंदीत मकरंद देशपांड यांनी दिग्दर्शित केलेलं ‘जोक’ आणि धर्मवीर भारती यांच्या कवितांवर आधारित ‘कनुप्रिया’ ही दोन नाटकंही करतेय. मराठीत वाडा चिरेबंदी हे नाटक सुरू आहे. ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला रसिकांचाही तुफान प्रतिसाद मिळतोय. यात फक्त ‘जोक’चे जास्त प्रयोग व्हावे अशी माझी इच्छा आहे. याव्यतिरिक्त एका मराठी सिनेमावर सध्या फक्त बोलणीच सुरू आहेत. हिंदीत मला आता सध्या काही प्रोजेक्ट आॅफर झाले नाहीयेत. भविष्यात पुन्हा हिंदीसाठी आॅफर आल्या तर त्यासाठी मी चॉइस ठेवली आहे. विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, सुजीत सरकार, सुजॉय घोष यांच्याच हिंदी सिनेमात मला काम करायला आवडेल.