सयाजी शिंदे दिसणार शेतकऱ्याच्या भूमिकेत !!

By Admin | Published: June 5, 2017 02:25 AM2017-06-05T02:25:46+5:302017-06-05T02:25:46+5:30

आजवर अनेक चित्रपटांतून बेरकी आणि भ्रष्ट राजकारणी, क्रूर खलनायक साकारलेले अभिनेता सयाजी शिंदे आता शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत

Sayaji Shinde to be seen as a farmer !! | सयाजी शिंदे दिसणार शेतकऱ्याच्या भूमिकेत !!

सयाजी शिंदे दिसणार शेतकऱ्याच्या भूमिकेत !!

googlenewsNext

आजवर अनेक चित्रपटांतून बेरकी आणि भ्रष्ट राजकारणी, क्रूर खलनायक साकारलेले अभिनेता सयाजी शिंदे आता शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘धोंडी’ हा चित्रपट ९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून आपली खलनायकी इमेज मोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आपल्या वडिलांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी दहा वर्षांचा एक मुलगा काय काय करामती करतो, याची वेधक कथा ‘धोंडी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. निरागस बालमन, नातेसंबंध, बदलती नैसर्गिक परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या अशा मुद्द्यांवरही हा चित्रपट भाष्य करतो. सॉईल इव्हेंट्स अँड एंटरटेन्मेंटच्या शिवाजीराव जाधव, संतोष सुतार, निखिल नानगुडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. बोलपट एंटरटेन्मेंट आणि ओशन ९ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. मोनिष उद्धव पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रोहित पंडित, मोनिष पवार यांनी चित्रपटाचं लेखन, दिनेश सटाणकर यांनी छायालेखन, किरण राज यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. सयाजी शिंदेंसह राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विवेक चाबुकस्वार, विनय आपटे, पूजा पवार, किशोर चौघुले, राघवेंद्र कडकोळ, सुहासिनी देशपांडे, उषा नाईक,अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे.
अतिशय ताकदीचा अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांची ओळख आहे. मात्र, बहुतांश चित्रपटांत त्यांनी खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटांतील त्यांच्या खलनायकी भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘धोंडी’ या चित्रपटात सयाजी शिंदे यांनी साकारलेल्या कनवाळू शेतकऱ्याच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. त्यांनाही या चित्रपटाविषयी आणि आपल्या भूमिकेविषयी प्रेक्षकांच्या प्रतिसादाची विशेष उत्सुकता आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीत सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काम केलं होतं. त्याशिवाय त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही केलं होतं. त्यामुळे मनानं शेतकऱ्याच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करणारे सयाजी आता शेतकऱ्याच्या भूमिकेला कसे सामोरे गेले आहेत, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Sayaji Shinde to be seen as a farmer !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.