मायबाप प्रेक्षकांचे प्रेम देते अभिनयाचे बळ! - तितिक्षा तावडे
By अबोली कुलकर्णी | Published: September 20, 2018 07:16 PM2018-09-20T19:16:47+5:302018-09-20T19:18:18+5:30
अभिनेत्री तितिक्षा तावडे झी युवा वाहिनीवरील ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेविषयी आणि तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी तिने मनसोक्त गप्पा मारल्या...
अभिनय क्षेत्र कलाकाराचे आयुष्य समृद्ध करते. या प्रवासात कलाकारांना जर मायबाप रसिक प्रेक्षकांची साथ लाभली तर त्यांच्या अभिनयाचा आलेख अधिकाधिक उंच जातो, असे मत मराठी इंडस्ट्रीची अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने व्यक्त केले. ती झी युवा वाहिनीवरील ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेविषयी आणि तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी तिने मनसोक्त गप्पा मारल्या...
* ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? सिद्धार्थ बोडखे यांच्यासोबत तू काम करतेस, कसा आहे अनुभव?
- राजवीर आणि मनवा यांची प्रेमकहानी या मालिकेत रंगवण्यात आली आहे. राजवीर आणि मनवा हे विचारांच्या बाबतीत एकदम विरूद्ध आहेत. तरीही राजवीर हा मनवाला जीवापाड प्रेम करत असतो. मात्र, या प्रेमाचा मनवाला किती त्रास होतो? हे त्याला कधी कळतच नाही. या मालिकेच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि मी पुन्हा एकत्र आलो. सिद्धार्थसोबत मी यापूर्वीही ‘अनन्या’ या नाटकात काम केलं होतं. त्यानंतर ‘असे हे कन्यादान’ यातही आम्ही काम केलं. सिद्धार्थसोबत पुन्हा एकदा काम करताना खूप चांगला अनुभव येतोय. खरंतर आम्ही अजून एपिसोड शूट केला नाही. मात्र, प्रेक्षकांचा मला कसा प्रतिसाद मिळतोय हे बघण्यास मी उत्सुक आहे.
* किती आव्हानात्मक वाटते मनवाची भूमिका? काय तयारी करावी लागली?
- मनवाची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मकच आहे. कारण, यापूर्वी मी ‘सरस्वती’ या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना भेटले. सरस्वती ही एक गावातली मुलगी होती. मात्र, मनवा ही सुशिक्षीत, स्वतंत्र विचारांची अशी आहे. प्रेक्षकांनी सरस्वतीवर खूप प्रेम केलं मात्र, मनवावरही त्यांनी तेवढंच प्रेम करावं, असं मला वाटतं.
* तू हॉटेल मॅनेजमेंट केलेलं असूनही अभिनय क्षेत्राकडे कशी वळलीस?
- माझी बहीण खुशबू तावडे मुळे. ती मराठी इंडस्ट्रीत काम करत होती तेव्हा मी शिक्षण घेत होते. तिच्याकडे बघूनच मला अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा मोह झाला. अन् मग मी ठरवलंच की, आपल्याला करायचं तर अभिनयक्षेत्रातच करिअर करायचं.
* अभिनय सोडून तुला क्रिकेटमध्येही रस आहे. १०वीत असेपर्यंत तू नॅशनलपर्यंत खेळली आहेस. काय सांगशील?
- होय, हे खरे आहे. आमच्या घरचं वातावरणच तसं होतं. शिक्षणासोबतच माझे वडील स्पोर्टसला देखील महत्त्व द्यायचे. त्यामुळे आमचा ओढा खेळाकडे आपसूकच वाढला. छान वाटतं की, अभिनय सोडून मला क्रिकेटमध्येही तितकाच रस आहे.
* तुला घरचे ‘गुडडू’ या नावाने तर सह कलाकार ‘टिटू’ या नावाने बोलावतात. कसं वाटतं जेव्हा सगळे एवढं प्रेम करतात?
- होय, हे खरं आहे. मला अगोदर घरी ‘गुड्डू’ या नावाने बोलवायचे. माझी बहीण खुशबू मला खासकरून गुड्डू या नावाने जास्त बोलावते. मग हळूहळू हे नाव सगळयांनाच कळाले. तितिक्षा म्हणून मला आवाज देणारे खूप कमी जण आहेत. पण, मला आता त्याचं काहीच वाटत नाही.
* तू सिंघम या चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहेस. आता पुन्हा संधी मिळाल्यास कोणत्या हिंदी कलाकारासोबत काम करायला आवडेल?
- होय, मी सिंघम या चित्रपटात एका ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. मजा आली सगळयांसोबत काम करताना. आता नक्कीच जर हिंदी कलाकारासोबत काम करायला मिळाले तर मला विकी कौशल यांच्यासोबत काम करायला आवडेल.
* तुझ्या खाऊच्या पेटीबद्दल बरंच ऐकलंय. त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
- होय, माझी खाऊची पेटी ही सगळयांसाठी स्पेशल असते. ज्यांना कुणाला भूक लागली ते त्यातून काहीही काढून खाऊ शकतात. मला जेवण बनवायला आवडतं पण, वेळेअभावी मी ते करू शकत नाही. त्यामुळे मी रोज त्यात काही ना काही जरूर घेऊन येते.
* तुला आम्ही साध्या, सोज्वळ अशा रूपातच पाहिलंय. खºया आयुष्यात तुला पारंपारिक की मॉडर्न वेशभूषेत राहायला आवडतं?
- मला पारंपारिक वेशभूषेत स्वत:ला कॅरी करणं तितकंसं जमत नाही. मी लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये रमत असल्याने माझ्या बाबांनी माझी बॉयकटच केली होती. मी दहावीच्या वर्गात असेपर्यंत बॉयकटवरच असायचे. पुढे मी केस वाढवले तेव्हा सगळे मला माझ्या हेअरकटविषयी विचारू लागले. पण, मला शोच्या निमित्ताने विविध ज्वेलरी, आभुषणं घालायला मिळतात पण, मला ते कॅरीच करता येत नाही. त्यामुळे माझं राहणीमान हे मॉडर्न प्रकारचं आहे.
* खुशबू आणि तुझ्या बाँण्डिंगविषयी जाणून घ्यायला आवडेल.
- मी अभिनय क्षेत्राकडे तिच्याकडे बघूनच वळले आहे. ती माझी मैत्रीण, सपोर्टर, उत्तम समीक्षक आहे. आम्ही एकमेकांना एकमेकांच्या मालिका, सीन्स यांच्याबददल विचारत असतो. एखादा सीन समजा चांगला झाला नाही तर आम्ही एकमेकांना ते सांगतो, कारण आम्हाला माहितीये की, आम्ही एकमेकांना चुकीच्या किंवा वाईट कमेंटस देणार नाहीत. एखादी वस्तू जरी खरेदी करायची म्हटली तर ती मला फोन करते की, ही वस्तू मी घेऊ की नको? एवढं आमचं स्ट्राँग बाँण्डिंग आहे. ती माझ्यावर आईसारखंच प्रेम करते.
* सोशल मीडियावर तू अॅक्टिव्ह असतेस. अशातच सेलिब्रिटींच्या ट्रोलिंगचे प्रमाण वाढलेय. काय सांगशील याविषयी?
- कुणाला आपण आवडतो? कुणाला नाही? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला वेगवेगळया कमेंटस देखील येतात. पण, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आता सोशल मीडियावर कुणी काय लिहावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, नेटिझन्सनी देखील थोडंसं भान ठेवणं अपेक्षित आहे.
* अभिनयाची तुझी व्याख्या काय?
- हृदयाला भिडणारी कला साकारणं म्हणजे अभिनय. मला तरी वाटतं की, केवळ हातवारे करून बोलणं आणि मोठया आवाजात डायलॉग म्हणणं म्हणजे अभिनय नव्हे, असं मला वाटतं.
* तुझ्या चाहत्यांसोबत घडलेला एखादा अविस्मरणीय किस्सा?
- माझ्यावर मायबाप रसिक प्रेक्षकांचे कायमच प्रेम आहे. त्यांचा पाठिंबा असल्यामुळेच मी आज चांगले काम करू शकतेय. मात्र, एक आठवणीत राहणारा किस्सा म्हणजे नाना पाटेकर सरांनी माझ्या हेडला फोन करून सांगितले की, तितिक्षाला सांगा की, ती खूप चांगले काम करते. दुसऱ्याच दिवशी ‘आपला माणूस’च्या प्रीमियरला आम्ही गेलो असताना त्यांनी मला जवळ बोलावून माझ्या कामाला शाबासकी दिली. मला खूप आनंद झाला. तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही.