‘भूमिका बघून चित्रपट निवडते’
By Admin | Published: July 9, 2017 01:38 AM2017-07-09T01:38:36+5:302017-07-09T01:38:36+5:30
‘ओए लक्की लक्की ओए’ या चित्रपटातून ऋचा चढ्ढाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या
- Geetanjali Ambre
‘ओए लक्की लक्की ओए’ या चित्रपटातून ऋचा चढ्ढाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. चित्रपट, शॉर्ट फिल्म, रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये तिने काम केले आहे. भारतात पहिल्यांदाच लाँच होणाऱ्या एका डिजिटल सिरीजमध्ये ती दिसणार आहे. याचसंदर्भात तिच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद....
तू थिएटर आणि चित्रपट दोन्ही ठिकाणी काम केले आहेस. या दोन्ही माध्यमांमध्ये काम करताना तुला काय फरक जाणवला?
- थिएटर हे एक लाईव्ह माध्यम आहे. ज्यात तुम्ही प्रेक्षकांशी डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता. चित्रपटात काम करताना तुम्हाला सुधारणा करण्याची संधी असते. एखादा सीन चांगला नाही झाला तर तुम्हाला तो परत करता येतो. थिएटरमध्ये काम करताना नाटक १ तासाचा असो किंवा ३ तासाचा तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट पाठ करावी लागते. तसेच थिएटरमध्ये काम करताना तुम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागते असे मला वाटते.
तुझा कोणीही या क्षेत्रात गॉडफादर नाहीये. अशा वेळी चित्रपट मिळणे किंवा या इंडस्ट्रीत आपला निभाव लागणे किती कठीण असते?
- मला असे वाटते, माझ्या वडिलांप्रमाणे प्रत्येक मुलीचे जर वडील असतील तर तिला आयुष्यात कधीही गॉडफादरची गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम असाल किंवा कोणत्या पद्धतीचे काम तुम्हाला करायचे आहे, हे जर तुमचे चित्र क्लिअर असेल तर खूप गोष्टी सोप्या होतात. जर तुम्हाला माहिती आहे, तुमचे कोणी इथे गॉडफादर नाही अशा वेळी तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतात.
याआधी तू शॉर्ट फिल्म, थिएटर आणि चित्रपटात काम केले आहेस तर तुझा डिजिटल मीडियावर काम करण्याचा अनुभव कसा होता?
- इथं काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आणि चांगला होता. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी मी खूपच उत्सुक होते. कारण इथे आम्हाला काम करताना पूर्ण स्वातंत्र्य होते. अॅक्शन, मसाला, आयटम साँग या सगळ्यांचा यात समावेश नसल्यामुळे त्याचे टेन्शन आम्हाला नव्हते. त्यामुळे सेन्सॉरची कात्री लागण्याची भीती आम्हाला नव्हती. क्रिकेट या खेळाचे वेड आपल्या देशात खूप जास्त आहे. तसेच बॉलिवूडबाबतही लोकांमध्ये क्रेझ आहे. पण, आपल्याला या दोन्हीमध्ये जाण्यासाठी किती स्ट्रगल आणि कष्ट करावे लागते याची कल्पना नसते. ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
तुझ्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल काय सांगशील?
- इन साइड एजनंतर मी एका चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २५ आॅगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस येणाऱ्या ‘फुकरे रिटर्न’ मधून मी तुमच्या भेटीला येईन.
तू अभिनयाच्या क्षेत्राकडे कशी वळलीस?
- मी दिल्लीत असल्यापासून मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मी मुंबईत शिक्षणाच्या निमित्ताने आले होते. मात्र, इथं येण्यामागचा माझा उद्देश अभिनयच होता. शिक्षण हे मुंबईत येण्याचे निमित्त मात्र होते. मला अभिनयात करिअर करायचे होते. मी मुंबईत येऊन सोशल मीडियाचा डिप्लोमाचा कोर्स केला. या कोर्सचा अभ्यास मी आनंदाने केला. या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाला मी सल्ला देऊ इच्छिते की, या फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करा.
तू चित्रपट निवडताना कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतेस?
- चित्रपट मी भूमिका बघून निवडते. तसेच चित्रपटाची स्क्रिप्ट आणि दिग्दर्शक देखील चित्रपट निवडताना महत्त्वाचे घटक मी मानते. त्यामुळे कोणताही चित्रपट निवडताना मी या सगळ्या गोष्टींचा विचार करते. माझ्यासाठी तुम्ही किती काम करता यापेक्षा तु्म्ही काय काम करता हे खूप महत्त्वाचे आहे.