ज्येष्ठ नागरिक म्हणजे ‘जुनं फर्निचर’ नव्हे... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 09:35 AM2024-05-05T09:35:49+5:302024-05-05T09:36:08+5:30

आकडेवारीचा विचार करता २०५० मध्ये एकूण लोकसंख्येच्या ३६ टक्के इतकी लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची असणार आहे.

Senior citizens are not 'old furniture'... | ज्येष्ठ नागरिक म्हणजे ‘जुनं फर्निचर’ नव्हे... 

ज्येष्ठ नागरिक म्हणजे ‘जुनं फर्निचर’ नव्हे... 

- डॉ. रोहिणी कसबे 
अर्थशास्त्राच्या प्राध्यापक
नं फर्निचर’ चित्रपटात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या अतिशय संवेदनशीलपणे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मांडल्या आहेत. या चित्रपटामुळे ज्येष्ठ नागरिकांचे एकटेपण, शारीरिक क्षमतांची होणारी हानी, आवश्यक असणारी विशेष देखभाल, कामानिमित्त मुलांचे दूर असणे आणि आर्थिक परावलंबित्व या सर्व गोष्टींचा पट समोर उभा राहतो. अर्थशास्त्राची प्राध्यापिका व एक संवेदनशील व्यक्ती म्हणून ज्येष्ठ नागरिकाच्या विविध समस्यांचा डोंगरच चित्रपट पाहिल्यानंतर मनात काहूर करू लागला. या समस्या फक्त शारीरिक नसून सामाजिक, भावनिक व आर्थिक आहेत. यातील आर्थिक बाजू पडताळून पाहिल्यास लक्षात येते की कोणताही व्यक्ती निवृत्तीनंतर जर आर्थिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम व स्वतंत्र असेल तरच निवृत्तीनंतरचा काळ सुसह्य होऊ शकतो.

२०५० पर्यंत किती ज्येष्ठ नागरिक?
आकडेवारीचा विचार करता २०५० मध्ये एकूण लोकसंख्येच्या ३६ टक्के इतकी लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची असणार आहे. जगातील सर्वांत तरुण असणारा भारत देश हा २०५० पर्यंत ३६ टक्क्यांपेक्षाही जास्त ज्येष्ठ नागरिक असणारा देश होईल. 

इतर आकडेवारी विचारात घेता २०२२ मध्ये १४९ दशलक्ष नागरिक हे ६० व त्यावरील वयाचे आहेत. जी एकूण लोकसंख्येच्या १०.५ टक्के आहे. 

विविध सरकारी योजनांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना विविध सोयी-सुविधा पुरवण्यात येत असल्या तरी सुद्धा समाजात त्यांना सन्मानाने जगता येण्यासाठी काही विशेष तरतुदींची आवश्यकता आहे. इतर विकसित देशांची तुलना करता भारतात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा या आजही प्राथमिक टप्प्यात असलेल्या दिसून येतात. 
यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये हा वर्ग पूर्णपणे दुर्लक्षित केला गेला. हा दुर्लक्षित वर्ग कुठेही अडगळ न ठरता समाजात या व्यक्तींना मानाचे स्थान मिळावे यासाठी अनेक कायदेशीर तरतुदी आहेत. 

१८ टक्के ज्येष्ठांना उत्पन्नाचे साधन नाही
यूएनएफपीए इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३च्या अहवालानुसार ४० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येची विपरीत आर्थिक स्थिती त्यांचा जीवनस्तर व आरोग्यविषयी सोयींवर घातक परिणाम करेल.
एकंदरीत या लोकसंख्येची कामाची स्थिती, निवृत्तिवेतन व त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत पाहता जवळजवळ १८ टक्के ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नसेल. 
ही भयावह परिस्थिती लक्षात घेता या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकारची भूमिका महत्त्वाची ठरेल. तसेच तरुण काळात म्हणजेच उत्पन्न मिळकतीच्या काळात केली गेलेली योग्य गुंतवणूक (आर्थिक व भावनिक) व आरोग्याची घेतली गेलेली योग्य काळजी (आहार, विहार, विचार) निवृत्ती काळ सुसह्य करण्यास वैयक्तिक पातळीवर मदत करेल. 

पालकांची काळजी घ्यावी...
जेव्हा कर्तव्यपूर्तीत कमतरता राहते तेव्हा कायद्याचा बडगा उगारला जातो. म्हणजेच प्रत्येक तरुण वर्गाने आपली कर्तव्यपूर्ती मानून आपल्या पालकांचा निवृत्तीनंतरचा काळ सुसह्य करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. 
आजच्या तरुण वर्गाने २०५० मध्ये आपली गणना ज्येष्ठ नागरिकांमध्ये होणार आहे, याची जाणीव ठेवल्यास काही प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या कमी करण्यात मदत होईल. 

Web Title: Senior citizens are not 'old furniture'...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.