ही आहे ‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या अभिमन्यूची रिअल लाईफ ‘लतिका’, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:55 PM2021-01-08T17:55:17+5:302021-01-08T17:58:53+5:30
कोण आहे सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिमन्युची खऱ्या आयुष्यातील जोडीदार?
लठ्ठ पण मनाने गोड मुलीची कथा असलेली ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहे. अभिमन्यू आणि लतिका यांची मालिकेतील जोडीही लोकप्रिय झाली. सध्या ही मालिका एका रंजक वळणावर आलीये. मालिकेत पुढे काय होणार, यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल. कारण तूर्तास आम्ही मालिकेबद्दल नाही तर अभिमन्यूच्या ख-या ‘लतिका’बद्दल सांगणार आहोत.
होय, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत अभिमन्यूची भूमिका साकारणारा अभिनेता समीर परांजपे याच्या रिअल लाईफ जोडीदाराबद्दल आम्ही सांगणार आहोत. ‘सुंदरा मनामध्ये भरली’चा अभिमन्यू अर्थात समीर परांजपे विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे नाव आहे अनुजा. अनुजा ही समीरची मैत्रिण होती. मैत्री प्रेमात बदलली आणि 27 नोव्हेंबर 2016 रोजी समीर व अनुजा लग्नबेडीत अडकले. तेव्हापासून दोघेही सुखात संसार करत आहेत.
समीर अभिनेता असला तरी अनुजाचा अभिनयाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. ती पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. अनुजासोबतचे अनेक फोटो अभिमन्यू त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करत असतो. हे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत.
नाटक, एकांकिका आणि सांस्कृतिक आवड असल्याने समीर हळूहळू कला जगताकडे वळला. हा प्रवास समीरसाठी नक्कीच सोपा नव्हता. इंजिनिअरिंग करण्यासाठी समीरने पुणो गाठले. इंजिनिअरची पदवी पूर्णही केली. मात्न, कलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. इंजिनिअरिंग करतानाच, एकांकिका आणि नाटकांमधून स्वत:च्या आवडीचा प्रवास सुरूच होता. फिरोदिया करंडक स्पर्धेतून समीरने आपल्या अभिनयाची झलक दाखवली.
अगदी सुरुवातीला समीरला राकेश सारंग यांच्या ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत छोटासा रोल मिळाला होता. ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील एका छोट्या पात्रापासून समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर गोठ, गर्जा महाराष्ट्र आणि अग्निहोत्र २ या मालिकेत त्यानं नायकाची भूमिका साकारली. भातुकली या चित्रपटातसुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. नेटफ्लिक्सच्या क्लास ऑफ 83 मधून नुकताच दिसलेला समीर आता सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत एका वेगळ्या नायकाच्या भूमिकेत आहे.