"सगळं श्रेय..." जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल शबाना आजमी म्हणाल्या, "हनीसोबत माझं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 08:48 AM2023-05-30T08:48:18+5:302023-05-30T08:49:21+5:30
हनी इराणीसोबत नेमके कसे संबंध आहेत याचा खुलासा स्वत: शबाना आजमींनी केला आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार, लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या शबाना आजमी (Shabana Azmi) या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव हनी इराणी (Honey Irani) असं आहे. शबाना आजमी आणि हनी इराणी यांच्यात नेमके कसे संबंध आहेत याचा खुलासा स्वत: शबाना आजमींनी केला आहे. त्यांचं केवळ झोया आणि फरहान सोबतच नाही तर हनी इराणी यांच्यासोबतही मैत्रीपूर्ण नातं आहे असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
शेखर कपूर यांच्या 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट' या ब्रिटिश रोमँटिक कॉमेडीत शबाना आजमी यांनी भूमिका साकारली आहे. पाश्चात्त्य देशांत असलेल्या असिस्टेड मॅरेज पद्धतीवर सिनेमा आधारित आहे.प्रेमाविषयी त्यांचे का विचार आहेत यावर फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, मी सुरुवातीला अजिबातच रोमँटिक नव्हते. मला मैत्री जास्त आवडते आणि मी त्याचा आदर करते. तसंच प्रेमात आदर नसेल तर ते प्रेम नाही. मी आणि जावेद आमच्यात टोकाची भांडणं होतात पण शेवटी एकमेकांचा आदर करणं जास्त महत्वाचं. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे आणि लग्न सुद्धा या मैत्रीच्या आड येणार नाही."
जावेद यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलांसोबत कसं नातं आहे?
या प्रश्नावर शबाना आजमी म्हणाल्या, "फरहान आणि झोया यांच्यासोबत माझी खूप छान मैत्री आहे. याचं श्रेय त्यांची आई हनी लाच द्यायला हवं. तिने जर मुलांना माझ्यापासून लांब ठेवायचं ठरवलं असतं तर आमच्यात मैत्री होऊच शकली नसती. त्यामुळे मी प्रामाणिकपणे मान्य करते की माझं मुलांसोबतच हनीबरोबरही मैत्रीपूर्ण नातं आहे. आमच्यात सुंदर बॉंड आहे. आणि मी उगीच त्यांच्यात नाक खुपसत नाही. जर मला वाटलं की त्यांना काही गोष्टी बोलायच्या नाहीत तर मी त्या बोलत नाही."